जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : मशीद आतून कशी असते, मशिदीत प्रार्थना कशी करतात असे प्रश्न अन्य धर्मीय लोकांना अनेकदा पडतो. अन्य धर्मियांच्या मनातील अशा अनेक प्रश्नांचे समाधान करण्यासाठी 'जमात ए इस्लामी हिंद' या संघटनेतर्फे 'मशीद परिचय या उपक्रमाचे नागपुरात आयोजन करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरचे अनेक हिंदू बांधव यापूर्वी कधीही मशिदीत गेले नव्हते. मशिदीची त्यांची ओळख ती फक्त बाहेरुनच... पण, मशीद नेमकी कशी असते ते थेट आत जाऊन बघण्याची संधी आता हिंदू बांधवांनाही उपलब्ध झालीय... अल्लाहची प्रार्थना कशी केली जाते? याची संपूर्ण पद्धतीही त्यांनी सविस्तर समजून घेतली. 


हिंदू आणि मुस्लीम धर्मियांत सलोखा वाढवण्यासाठी 'जमात ए इस्लामी हिंद' या संघटनेनं पुढाकार घेतला. त्यातूनच मशीद परिचय या उपक्रमाद्वारे मुस्लिमेतर धर्मियांसाठी आणि खासकरून हिंदूंसाठी नागपूरमधल्या मशिदीचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत, अशी माहिती या संघटनेचे सदस्य असलेल्या डॉ. एन के ख्वाजा यांनी दिलीय. 


कुठल्याही गोष्टींबद्दल दुसऱ्यांच्या मनात असलेली शंका दूर करण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे शंका असलेल्या गोष्टीबद्दल जनजागृती करणं... मशीद आणि मुस्लिमांविषयी समाजात अनेक समज-गैरसमज आहेत, ते दूर करण्याचा नागपूरमधल्या 'जमात ए इस्लामी हिंद'चा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद असाच आहे. त्याच सर्वच थरांतून कौतुक होतंय.