नागपूर सामूहिक हत्याकांड प्रकरणी विवेक पालटकरला पंजाबमधून अटक
या हत्येमुळे राज्यभर खळबळ उडाली होती. तसेच, गृहमंत्राल्याच्या कारभारावरही टीका झाली होती.
नागपूर: कमलाकर पवनकर कुटुंबातील सामूहिक हत्याकांड प्रकरणातला क्रुरकर्मा विवेक पालटकर याच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या. गुन्हे अन्वेशन शाखेने त्याला पंजाबमधून गुरूवारी अटक केली. पोलिसांचे एक पथक विवेकला घेऊन नागपूरला येत आहे. राज्याची राजधानी असलेल्या नागपूरमध्ये कमलाकर पवनकर कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे राज्यभर खळबळ उडाली होती. तसेच, गृहमंत्राल्याच्या कारभारावरही टीका झाली होती.
हत्याकांडानंतर राज्यभर खळबळ
कमलाकर पनकर हे भाजपचे कार्यकर्ते होते. ११ जुनला कमलाकर मोतीराम पवनकर (५३), अर्चना कमलाकर पवनकर (४५), वेदांती कमलाकर पवनकर (१२), मीराबाई मोतीराम पवनकर (७५) आणि कृष्णा विवेक पालटकर (५) यांचे मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत राहत्या घरात आढळले. या हत्येनंतर एकच खळबळ उडाली. या हत्येबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, ११ जूनला विवेक पालटकरने स्वत:च्या मुलासह बहीण, मेव्हणा, सासू, भाची अशा पाच जणांची निर्घृण हत्या केल्याचे पुढे आले. हत्येनंतर आरोपी विवेक पालटकर पसार झाला होता. खरबी रोड येथील आराधनानगर येथे ही घटना घडली होती.
जादूटोण्यातून हत्या?
दरम्यान, आर्थिक वादातून हे हत्याकांड घडले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अदाज होता. मात्र, पोलिसांनी विवेक राहात घरावर टाकलेल्या छाप्यात जादूटोणा करण्याचे साहित्य सापडले. त्यामुळे या हत्या प्रकरणात एक नवाच मुद्दा पुढे आला आहे. हे हत्याकांड जादूटोणा करण्याच्या उद्देशाने तर झाले नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी विवेकला अटक केल्यामुळे हत्येचे कारण लवकरच पुढे येण्याची शक्यता आहे.