COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : आईपासून ताटातूट कुणीच सहन करू शकत नाही...मग तो माणूस असो वा वन्यप्राणी...हृदयाला पाझर फोडणारी अशीच एकच घटना नगापुरातील सेमिनरी हिल्स ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटरमध्ये पहायला मिळाली. माकडीण आणि तिच्या पिल्लामध्ये ताटातूट झाली होती. मात्र दीड महिन्यांपासून पिंजऱ्यात असलेल्या माकडणीनं ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला पिल्लाला पाहताच वेगवेगळ्या पिंजऱ्यात असलेल्या माकडीण आणि पिल्लामध्ये भेटण्यासाठी धडपड सुरु झाली. त्यांची ही धडपड ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमधील संवेदनशील कर्मचाऱ्यांनी अचूक हेरली..त्यानंतर  माकडीण आणि तिच्या पिल्लाचा मातृत्वाचा सोहळा पाहून अनेकांचे डोळे पाणावले.


नागपूर शहरालगतच्या एका गावात लॉकडाऊनदरम्यान माकडांच्या एका टोळीनं प्रचंड धुमाकूळ घातल्याने गावातील नागरिक त्रस्त झाले होते.  धुमाकूळ घालणाऱ्या माकडांचा सरदार आणि काही माकडांना ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी दीड महिन्यापूर्वी टप्प्याटप्प्याने पकडून आणले. 



यात पकडून आणलेल्या माकडांमध्ये एक मादी माकडही होते. तिला लहान पिल्लू असल्याची पुसटशी कल्पनाही ट्रान्झिट ट्रिटमेंटर कुणत्याच कर्मचाऱ्यांना नव्हती. दरम्यान या गावातील काही पिंजरे तसेच होते. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी माकडाचे एक पिल्लू पिंजऱ्यात सापडल्यानंतर त्यालाही ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला आणले.


त्याचा पिंजरा मादी माकडणीच्या पिंजऱ्याच्या बाजूलाच ठेवला होता. दीड महिन्यापासून मुलाच्या विरहामुळं अस्वस्थ असलेल्या मादी माकडीण त्या पिल्लाला पाहून पिंज-यातच धडपड करू लागली. तर ते पिल्लूही त्या मादी माकडणीकडे पाहून तिच्या दिशेने जाण्यासाठी पिंज-यातच उड्या मारू लागले


ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमधील कर्म-यांनी त्या दोघांमधील धडपड ओळखली...त्या दोघांना एका पिंज-यात ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना एका पिंजऱ्यात सोडताना मादी माकडीणनं त्या पिल्लाला कवटाळले. बराच वेळ त्या पिल्लाची आई त्याला उराशी घट्ट उराशी पकडून होती. मातृत्वाचा हा सोहळा तेथील कर्मचाऱ्यांनी डोळ्यानं टिपताना तेथील सर्वांचेच डोळे पाणवले.


दुरावलेलं पिल्लू बऱ्याच कालावधीनंतर तिच्या कवेत होतं. त्यानंतर तिनं त्या पिल्लाला पुढील दोन दिवस त्या पिल्लाला कवटाळून ठेवले होते. दरम्यान आई-पिल्लाच्या या भेटीनंतर कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांनी दोघांना जंगलात सुरक्षित जागी सोडून दिलं. मात्र मातृत्वाचा हा सोहळा प्रत्येकाच्या जीवनात आयुष्यभर स्मरणात राहणार असाच ठरला.