मुंबई : उत्तर भारतात थंडीची लाट पसरलेली असतानाच आता राज्यातही थंडीचा कडाका वाढू लागला आहे. धुळ्यामागोमाग आता निफाड, नागपूरातही गोठवणारी थंडी पडू लागली आहे. बऱ्याच ठिकाणी हवेतील या गारव्यामुळे गरम कपड्यांशिवाय नाजरिक घराबाहेर येणंही टाळत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये सध्या शीतलहर पाहायला मिळत आहे. परिणामी तापमानाचा पाराही खाली गेला आहे. नागपूरमध्ये तापमान ५.३ अंशांवर पोहोचलं आहे. तर, नंदुरबारमध्ये पारा ६ अंशांवर गेला आहे. नाशिकमध्ये पारा ११ अंशांवर घसरला असून, निफाडचा पारादेखील १५ अंशावर आला आहे. या थंडीमुळे नाशिककरांमध्येही उत्साह आहेच शिवाय गुलाबी थंडीमुळे पर्यटन स्थळांवरही गर्दी होऊ लागली आहे.  


महाराष्ट्रात थंडीचं आगमन उशिरानं झालं खरं. मात्र सर्वात आधी तापमानानं निचांक गाठलाय तो म्हणजे खान्देशात. धुळ्यात या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय. शनिवारी जळगावमध्येही सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. येत्या काही दिवासंमध्ये हवामानाचा अंदाज पाहता उत्तर भारतातील शीतलहरीचे परिणाम राज्यातही उमटण्याची चिन्हं असल्याचं कळत आहे. 


वाचा : शिमल्याहूनही दिल्लीत थंडीचा कडाका 



हिमालयातून येणाऱ्या या शीतलहरी पाहता जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर तापमानाने निचांक गाठला आहे. यातील बहुतांश भागांमध्ये हिमवृष्टी झाल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. वाहतुकीच्या मार्गांवरही या परिस्थितीचे परिणाम झाले आहेत.