अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सोलर एक्सप्लोसिव्ह लिमिटेड (Solar Industries India Ltd) स्फोटकांची निर्मिती करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात नऊ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सकाळी 9.30 वाजता हा भयावह स्फोट झाला. सध्या मदत व बचाव कार्य सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने मृतांना पाच लाखांची शासकीय मदत जाहीर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलर एक्सप्लोसिव्ह लिमिटेडमध्ये झालेल्या स्फोटात मृतांमध्ये सहा महिलांचा देखील समावेश आहे. कंपनीमध्ये सकाळची पहिली शिफ्ट सुरू असताना हा अपघात झाला आहे. या स्फोटामध्ये आरती निळकंठ सहारे या 23 वर्षीय तरुणीचा देखील मृत्यू झाला आहे. ती नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कामठी मासोद येथील रहिवासी होती. 2019 साली ती सोलर इंडस्ट्रीज मध्ये कामाला लागली होती आणि तेव्हापासून नियमित सेवेत होती. विशेष म्हणजे आरती ही तिच्या कुटुंबासाठी आधारस्तंभ होती आणि एका मुलाचेच कर्तव्य ती पार पाडत होती.


आरतीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे वडील आणि आई दोघेही अपंग असून तिनेच लहान बहिणीचे लग्न लावून दिले होते. आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी आरतीने काम करण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी तिची सुट्टी असताना देखील कामावर बोलवण्यात आल्यामुळे आरती सकाळी साडेसहा वाजता कंपनीमध्ये पोहोचली होती. मात्र कोळसा खाणींसाठी तयार करण्यात येणाऱ्या स्फोटकांच्या युनिटमध्ये स्फोट झाल्याने ती अडकली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.


आरतीच्या मृत्यूची माहिती कळताच तिचे आजारी वडील नीलकंठ सहारे यांना मोठ्या धक्का बसला आहे. ते घटनास्थळी दाखल झाले असले तरी त्यांना आज प्रवेश मिळाला नसल्याने त्यांच्या जीवाची घालमेल होत आहे. कमीत कमी माझ्या मुलीचा मृतदेह तरी मला पाहू द्या अशी वेदना ते बोलून दाखवत आहेत. आरतीच्या मृत्यूमुळे तिच्या गावातील ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले असून मृतकांना कंपनीने दुप्पट मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.


"आरतीच्या कुटुंबियावर खूप मोठा आघात झाला आहे. त्यांच्याकडे फक्त बकऱ्या आहेत आणि त्यांच्यावर ते घराचे पालनपोषण करतात. त्यांच्याकडे शेती व्यवसाय नाही. यांचा आधार ही मुलगीच होती जिचा स्फोटात मृत्यू झाला आहे. हे या धक्क्यातून सावरु शकत नाहीत. वडील दिव्यांग असून त्यांना चालताही येत नाही," असे एका व्यक्तीने म्हटलं आहे. 


दरम्यान, सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांचं उत्पादन केलं जातं. सकाळी झालेल्या स्फोटात कंपनीतील नऊ कामगारांचा मृत्यू झाला आहे. सोलर ग्रुपद्वारे संचालित इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड ही संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांची निर्मिती करणारी देशातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीतून भारतीय लष्कर, नौदलासाठी लागणाऱ्या विविध शस्त्रास्त्रांचं उत्पादन होतं. तसेच या कंपनीकडून तीसहून अधिक देशांमध्ये शस्त्रास्त्रांची निर्यात करण्यात येते.