सट्ट्यानं केला कुटुंबाचा घात, पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून आत्महत्या
नागपूरातील मदन अग्रवाल आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : ज्याच्या विश्वासावर संसाराचा डोलारा उभारला, त्यानंच या कुटुंबाचा घात केलाय. सट्ट्याच्या व्यसनापायी नागपूरमध्ये रहाणाऱ्या मदन अग्रवाल या तरुणाने आपल्या दोन चिमुकल्यांची आणि पत्नी किरणची हत्या करून आत्महत्या केली.
नागपूरच्या दयानंद पार्क परिसरात राहणाऱ्या मदनचा चायनीजचा व्यवसाय होता. त्याची मिळकतही चांगली होती. मात्र त्याला क्रिकेट सट्ट्याचं व्यसन जडलं. त्यात त्यानं होतं नव्हतं, ते सारं गमावलं. सट्ट्यापायी तो कर्जाच्या विळख्यात अडकला. तीन महिन्यांपूर्वी बँकेनं त्याचं घरही जप्त केलं होतं. सध्या तो भाड्याच्या घरात राहत होता. अखेर मंगळवारी त्यानं टोकाचं पाऊल उचललं आणि कुटुंबासह स्वतःचाही घात केला.
मदनच्या एका चुकीमुळे पत्नी किरण, दहा वर्षांचा वृषभ आणि पाच वर्षांच्या टियाला आपला जीव गमवावा लागलाय. झटपट पैसे कमावण्याच्या नादात एक अख्खं कुटुंब जिवानिशी गेलं.