अमर काणे, प्रतिनिधी, झी मीडिया, नागपूर : जिद्द असली तर कोणतंही  विघ्न असो किंवा विपरीत परिस्थिती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. नागपूरच्या पाखी मोर या विद्यार्थीनीने बारावीत कला शाखेरत मिळवलेलं यश हेच दाखवून देतं. जीवघेण्या अपघातानंतर तब्बल ५ महिने पाखी कोमात होती. कोमामधून सामान्य जीवनात परतल्यानंतरही चालणं तर दूरचं एक शब्द उचारण्यासाठीही पाखीला संघर्ष करावा लागत होता. अशा विपरीत परिस्थितीत  अवघ्या साडेपाच महिन्यात कला शाखेचा अभ्यास करत पाखी तब्बल ९५.७ टक्के गुण घेत विभागात अव्वल आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाखी मुळातच हुशार आहे. दहावीत तिला ९८.८ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीतही असंच यश मिळवण्यासाठी विज्ञान शाखेत तिनं जोमाने अभ्यास सुरु केला होता. मात्र नोव्हेंबर २०१७ मध्ये अघटित घडलं. महाराजबाग चौकात तिचा अपघात झाला आणि तिच्या डोक्यावर जबर दुखापत झाली.


नागपुरात डॉक्टरांनी तिच्यावर उचपार केला, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. आपल्या लाडक्या लेकीसाठी आई-वडिलांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरु केले. तिला उपचारासाठी मुंबईला घेवून गेले. अखेर आई वडिलांच्या प्रयत्नाला यश आलं. ५ महिन्यानंतर पाखीनं उपचारांना प्रतिसाद दिला.


पाखीच्या अपघानानंतरचा कालावधी आमच्याकरता फार कठीण असल्याचं तिचे वडिल अरुणी कुमार मोर यांनी सांगितलं. 'या आघातातून कसं बाहेर निघू हेच समजत नव्हतं. मुलगी वाचेल का याबाबत शंका होती, पण आम्ही हिंमत न सोडता सगळे प्रयत्न केले आणि देवाच्या कृपेने आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे ती वाचली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यातून बाहेर पडायला तिला बराच संघर्ष करावा लागला', असं वडिलांनी सांगितलं.


पाखी कोमातून सामन्य जगात परतली असली तरी सुरुवातील तिला काहीच हालचाल करता येत नव्हती. इतकेच नव्हे तर तिची स्मृतीसुद्धा परतली नव्हती. वेगवेगळ्या थेरपी सुरुच होत्या. डॉक्टरांनी तिचा मेंदू कार्यन्वयीत ठेवण्यासाठी तिला व्यस्त ठेवण्याचा सल्ला दिला. उत्कृष्ट बुद्धीबळपटू असलेल्या पाखीनं आई-वडिलांच्या मदतीनं अभ्यासाला सुरुवात केली.


सुरुवातील विज्ञान शाखेचा अभ्यास सुरु केला. मात्र विज्ञान शाखेचा अवाका आणि परीक्षेचा कालावधी कमी असल्यामुळे मग तिने कला शाखेत प्रवेश घेतला. सुरुवातीचा अभ्यास करताना पाखीला प्रचंड त्रास व्हायचा, मात्र आम्ही तिला हिंमत दिल्याच पाखीची आई प्राची मोर म्हणाल्या.


पाखीला सतत व्यस्त ठेवताना, बुद्धीला चालना देण्यासाठी तिला अभ्यासात मदत करायचो, त्याकरता पाखीच्या वडिलांनी व्यवसायाकडेही दुर्लक्ष झाल्याच आई सांगत होती. मी पण आर्किटेक आहे, पण पती आणि मी दोघांनीही पाखीकरता पूर्णवेळ देण्याचं ठरविले होते. आम्ही तिच्या संघर्षाला पूर्ण साथ दिल्यास आईन सांगितलं. आईच्या मदतीनं अभ्यास करत पाखीनं झपाट्यानं प्रगती केली. अवघ्या साडेपाच महिन्यात उपाचार घेत असताना अभ्यास करत पाखीनं बारावीत कला शाखेत तब्बल ९५.७ टक्के गुण घेण्याची किमया साधली.


विपरीत परिस्थीत पाखीनं मिळवलेल यश अव्दितीय आणि प्रत्येकासाठी प्रेरणा देणार असल्याची प्रतिक्रिया हिस्लॉप कॉलेजमधील शिक्षिक शीतल पीटर यांनी दिली आहे. बारावीनंतर आपण विधी क्षेत्रातील प्रवेश परीक्षा दिल्याचं पाखीनं सांगितलं. परिस्थीती कितीही कठीण असली तरी हार मानायची नाही. हा आपल्या यशाचा मंत्र असल्याचं वक्तव्य पाखीने केलं.