अमर काणे, झी मीडिया, नागपूर : रेल्वेचा निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. शरद जयस्वाल असे मयत 35 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. ते काही दिवसापूर्वी ते प्रयागराजला आपल्या घरी गेले होते. त्यानंतर ते मंगळवारी गंगा-कावेरी एक्स्प्रेसनं प्रयागराजहून नागपुरात येत होते. एसी- थ्री टायरच्या बी-1 बोगीतून प्रवास करत असताना जबलपूरजवळ त्यांची प्रकृती बिघडली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकृती बिघडल्याने शरद यांनी रेल्वे हेल्पलाईनला मेडिकल मदतीकरता कॉल करून सांगितले. तसेच संबंधीत बोगीतील टीसी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनाही सांगितलं. मात्र त्याची दखल संबंधीतांपैकी कुणीच घेतली नाही. त्यामुळे  इटारसीला त्यांच्यावर उपचार झाले नाही. दरम्यान जयस्वाल यांची प्रकृती खूप ढासळल्याचे नागपुरातील त्यांच्या मित्र आणि कुटुबियांना एका प्रवाशाने फोनकरून सांगितले. दरम्यान नागपुरात गंगा-कावेरी एक्स्प्रेस रात्री 10 च्या सुमारास पोहचली असता जयस्वाल यांची कोणतीच हालचाल होत नव्हती.
त्यामुळे त्यांच्या मित्रांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले.


खासगी रुग्णालयात नेले असता शरद यांना मृत घोषित करण्यात आले. जयस्वाल यांच्यावर इटारसी स्टेशनवर उपचार झाला असता तर कदाचीत त्यांचा जीव वाचला असता. मात्र रेल्वे हेल्पलाईनकडून आणि संबंधीत रेल्वे कर्मचाऱ्यांनी कोणतीच हालचाल केली नाही. त्यामुळे शरद जयस्वाल यांचा
मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक कमलकांत यांनी केला आहे. याबाबत तक्रार घेण्यासही रेल्वे प्रशासनाकडून अगोदर टाळाटाळ केली. 



'झी मीडिया'ने याप्रकरणाची दखल घेतल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली. जबलपूर- इटारसी दरम्यान जयस्वाल यांची प्रकृती बिघडल्याची सूचना आली होती, असं नागपूर मंडळाचे सहायक वाणिज्य प्रबंधक सी जी राव यांनी सांगितले. हे प्रकरण गंभीर असून याप्रकरणी संबंधीत ( इटारसी-जबलपूर मार्ग ज्या मंडळाच्या अंतर्गत येत) मंडळास कळवल्याचे त्यांनी सांगितले.