अमर काणे, झी मीडिया, नागपूर : शहरातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलीस प्रशासानाकडे आहे. मात्र आता राज्याच्या उपराजधानीत आता पोलिसांना कुख्यात गुन्हेगारांबरोबर शहरातील भटक्या श्वानांवर (stray dogs) नजर ठेवून त्यांची गणना करावी लागणार आहे. भटक्या कुत्र्यांसदर्भातील माहिती आता पोलिसांना गोळा (Nagpur Police) करावी लागणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 44 अंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांसाठी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर शहरात मोकाट श्वानांचा (stray dogs) प्रश्न जटिल बनत चालला आहे. यामुळेच अनेकदा गंभीर प्रश्नदेखील उपस्थित झाले आहेत. यातील काही प्रकरणं ही थेट पोलिसांत पोहोचली आहेत. त्यामुळे आता नागपूर पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांसाठी परिपत्रक जारी करत मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना परिपत्रकाद्वारे या सूचना देण्यात आल्या आहेत.


पोलीस ठाण्याच्या परिसरात किती मोकाट कुत्रे आहेत, याबाबत शहानिशा करून त्याबद्दलची माहिती तयार करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तसेच भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि पुढील कारवाई करण्यासाठी महानगरपालिका व संबंधित मॉनिटरिंग कमिटीला सूचना द्याव्यात असेही या परिपत्रकात म्हटले आहे.


यासोबतच पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या तीन वर्षात किती मोकाट कुत्र्यांनी लोकांना चावे घेतले, याबाबतच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या, ही माहिती देखील गोळा करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. सामाजिक संस्था व स्थानिक नागरीक भटक्या कुत्र्यांना नियमितपणे रस्त्यावरील एका ठिकाणी अन्न टाकतात का यावर लक्ष देण्याच्या सूचना ही या परिपत्रकात देण्यात आल्या आहे. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी बंदोबस्त या सर्व जबाबदारी चोख पार पाडताना या नव्या जबाबदारीचा देखील भार असणार आहे.