अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वेलतूर पोलीस स्टेशन अंतर्गत आंभोरा येथे वैनगंगा नदी पात्रात एका दाम्पत्याने मुलीसह सामुहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी ही घटना स्थानिक नागरिकांच्या नजरेस पडल्यानंतर उघडकीस आली. श्याम गजानन नारनवरे (वय ४६), सवीता श्याम नारनवरे (वय ३५) समिता उर्फ समीक्षा श्याम नारनवरे (वय १२) अशी तिन्ही मृतकांची नावे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे कुटुंब नागपूर मधील वाठोडा येथील अनमोल नगरचे रहिवासी होते. श्याम नारनवरे हे संत जगनाडे महाराज कोऑपरेटीव्ह सोसायटीत रोखपाल असल्याचे समोर आले आहे.


वैनगंगा नदी पात्रात रविवार काही लोक मासेमारी करण्यासाठी गेले असता पुलावर त्यांना एक मोटरसायकल उभी दिसली. या मोटरसायकलला एक जॅकेट, एक लेडीज शाल आणि स्वेटर लटकलेले होते. तर गाडीच्या बाजूला कठड्यावर लेडीज चप्पल दिसली. 



शंका आल्याने मासेमारानी पोलिस पाटलांना माहिती दिल्यानंतर त्यांनी वेलतूर पोलिस   घटनास्थळी पोहोचले आणि शोधाशोध सुरू केली असता दुपारी दीडच्या सुमारास आई व मुलीचा तर संध्याकाळी वडिलांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 


या हृदयद्रावक घटनेत आईचे हात मुलीच्या कंबरेला ओढणीने बांधलेले होते. तर वडीलांचेही हात बांधलेले होते.   


या प्रकरणी वेलतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अजून कळू शकले नाही.