नागपूर : नागपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी आणि या विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करणाऱ्या आणि शासकीय यंत्रणेचा कारभार मोठ्या जबाबदारीनं सांभाळणाऱ्या पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द मुंढे यांनीच ट्विट करत याबाबतची माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे', असं म्हणत आपल्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नसल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या काळात नियमांप्रमाणं आपण विलगीकरणात राहणार असून, मागील १४ दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. 



 


कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असली तरीही यापुढील काही दिवस आपण घरुनच कामकाज पाहणार असून, कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी काम करत राहू अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली. नागपूरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी या काळातही आपण काम करतच राहू अशी हमी देत त्यांनी, आपण कोरोनासोबतचा हा लढा नक्कीच जिंकू असा विश्वासही व्यक्त केला.  


दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये नागपूर शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट  यावर भर दिला जात आहे. यासाठी तुकाराम मुंढे यांनीही जातीनं लक्ष देत काही महत्त्वाची पावलं उचलल्याचं पाहायला मिळालं आहे. मिशन बिगीन अगेन’मध्ये शिथिलता दिल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली  आणि मृत्युसंख्याही वाढली. सद्यस्थितीत दररोज तीन हजार  नागरिकांची  कोव्हिड  चाचणी केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.