नागपूर : राज्यात चांगले यश मिळेल आणि देशात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल. त्यामुळे पुढेचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केला आहे. नागपूरचे प्रतिनिधी अमर काणे यांनी ही मुलाखत घेतली. (मुलाखत पाहा बातमीच्या शेवटी) मी गेल्या निवडणुकीला जी आश्वासने दिली होती, ती सगळी कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे आता काय करायचं हा माझ्या पुढे प्रश्न आहे. लोकांना काय आश्वासन द्यायचे. त्याचा विचार सुरु आहे. काय नवे करता येईल, याचा विचार सुरु आहे. मी माझ्या मतदार संघात काय करता येईल, याबाबत जाहीरनाम्यासाठी विचार करत आहे. त्याचवेळी पक्षाचा जाहीरनामा करताना त्याचा विचार करुन नव्याने जी कामे करता येतील, त्याबाबत लवकरच जाहीर करु, असे गडकरी म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, गडकरी यांनी सर्जिकल स्ट्राईकचे कोणीही राजकारण करु नये, असे आवाहन केले. सर्जिकल स्ट्राईक हा वेगळा विषय आहे. तो देशाच्या संरक्षणविषयी निगडीत आहे. त्यामुळे त्याचा राजकारणी संबंध आणता कामा नये. काँग्रेसने याचा वापर करुन भाजपवर टीका केली. त्यावर गडकरी म्हणालेत, मुळात राजकारण करणे योग्य नाही. पंतप्रधान हा देशाचा असतो. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ज्या पद्धतीने टीका करत आहेत, ती योग्य नाही. राजकारण कोणत्या पातळीवर करावे, याचाही विचार झाला पाहिजे, असे गडकरी म्हणालेत.


नागपुरातून काँग्रेसने नाना पटोले यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. यावर गडकरी म्हणालेत, लोकशाहीत कोणाला तिकीट द्यावे, हा त्या पक्षाचा निर्णय आहे. मी त्यांचे नाव घेणार नाही, मी जी कामे केली आहेत. त्यामुळे लोक विकासकामांना प्राधान्य देतील. माझ्याविरोधात काँग्रेसला नागपुरात उमेदवार मिळाला नसेल म्हणून त्यांना दिली असेल उमेदवारी. तो त्यांचा निर्णय आहे. त्याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही. राज्यात युतीला चांगले यश मिळेल. या निवडणुकीत गेल्यापेक्षा दोन ते तीन जागा निश्चित जास्त मिळतील. आणि देशातही चांगले यश मिळेल. यावेळी आम्ही तीनशेपेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत मोदीच राहतील, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.


मी अनेकवेळा जे स्पष्ट बोलतो. त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो. किंवा माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून काही चालविले जाते. माझ्या तोंडामध्ये ते घातले जाते, हे योग्य नाही. ते चुकीचे आहे. जर तुमच्यात दम असेल तर थेट बोलले पाहिजे. त्याचप्रमाणे कुठल्याच पक्षाने एअरस्ट्राईकचे राजकारण करू नये. गोळी झाडण्यासाठी आपला खांदा न वापरण्याचं माध्यमांना आवाहन केले. तसेच युतीची बोलणी झाली त्यावेळी तुम्ही कोठे दिसला नाहीत, यावर ते म्हणाले माझी त्यांना गरज भासली नसेल. ज्यावेळी माझी गरज असेल त्यावेळी मी नक्की चर्चा करीन. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले काम केले आहे. ते चांगलेच करत आहेत. युतीबाबत त्यांनी माझ्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यामुळे हा विषय याठिकाणी येत नाही. मुख्यमंत्र्यांचे राज्यात चांगले चालले आहे. तसेच माढा लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांनी माघार घेतली त्याबाबत गडकरी म्हणाले, पवार हे मोठे राजकारणी आहेत. त्यांनी आता माघार घेतली असली तरी त्यांना पुन्हा आग्रह झाला तर ते निवडणुकीच्या रिंगणात दिसतील.