नागपूर : कोरोनामुळे अगोदरच लांबलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. विद्यापीठ  कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे  १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.मंगळवारी रात्री यासंदर्भातील परिपत्रक काढण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचार्‍यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेशपत्रच पोहोचले नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी प्राचार्य फोरमनेदेखील केली होती. विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेसाठी दोन दिवसांआधी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तयार करून ते महाविद्यालयांना पाठविले होते. मात्र कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनामुळं  त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत होता. 


अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या  कामबंद आंदोलनामुळे परीक्षा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे आंदोलन मिटल्यावरच परीक्षा घेण्यात येतील,अशी माहिती  परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉक्टर प्रफुल्ल  साबळे यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्याना नाहक मनःस्ताप सहन करावा लागणार आहे.नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना १ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विद्यापीठाने  मोबाईलवरुन परीक्षा देण्यासाठी विशेष अ‍ॅपदेखील विकसित केले होते. यासंदर्भातील तयारी अंतिम टप्प्यात आली होती.