रॅगिंगला कंटाळून २३ वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या
`रुग्णालय प्रशासनाने वेळीच तक्रारीची दखल घेतली असती तर...`
विकास भदाणे, झी २४ तास, जळगाव : मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या महिला डॉक्टरनं रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव... ती २३ वर्षांची होती. ती मूळची जळगावची होती. तीन वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ महिला डॉक्टर्सनी केलेल्या रॅगिंगला कंटाळून पायलनं गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, मयत डॉक्टर पायल तडवी यांचा मृतदेह जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आणण्यात आलाय. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करत तिच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलंय.
तिच्या आईनं रॅगिंगबाबत १० मे रोजी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यात डॉ. हेमा आहुजा, डॉ भक्ती अहिरे आणि डॉ अंकिता खंडेलवाल या वरिष्ठ डॉक्टर पायलचा छळ करत असल्याचं म्हटलंय. रुग्णालय प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप पायलच्या आईनं केलाय. रुग्णालय प्रशासनाने वेळीच तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित ही घटना टळली असती, असंही नातेवाईकांनी म्हटलंय.
तर आत्महत्येविरोधात मुंबईतील आग्रीपाडा पोलिसांत तीन सहडॉक्टर तरुणींविरोधात रॅगिंग तसंच आत्महत्तेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.