मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांना घेत शिवसेनेतून बाहेर पडत फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं होतं. या सरकार स्थापनेबद्दल लोकमतच्या 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यामध्ये बोलताना मुख्यमंत्री महोदयांनी अनेक खुलासे केले आहेत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना, 2019 वेळी जी चूक केली ती आम्ही तीन महिन्यांपूर्वी सुधारल्याचंं शिंदे म्हणाले. त्यानंतर नानांनी ही चूक सुधारायला अडीच वर्षे का लागलीत, असा सवाल नानांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नानांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य आहेत. तीन महिन्यांपूर्वी आम्ही जे केलं तो तुमचा आणि मतदारांचा आदर आहे.  2019 ला हा आदर व्हायला पाहिजे होता. आम्ही सेना-भाजप युती म्हणून लढलो होतो आणि आम्हाला बहुमत मिळालं होतं. भाजपचे 100 आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले होते. मतदारांना वाटलं  बहुमताप्रमाणे सरकार स्थापन होईल. पण दुर्दैवाने तसं झालं नाही, पण आम्ही तेच तीन महिन्यापूर्वी केल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यानंतर नानांनी आणखी एक कोंडीत पकडणारा प्रश्न केला. 


तीन महिन्याआधी जे केलं ते करायला अडीच वर्षे का लागली?, यावर बोलताना, योग वेळ काळ सर्व पाहिजे, त्याकाळात कोविडही सुरू होता, आम्ही काही करायला गेलो असतो तर कोविड असताना असं का करता, असा प्रश्न केला गेला असता. त्या काळात आम्ही प्रयत्न केल्याचं शिंदे म्हणाले. त्यानंतर फडणवीसांनी आपलं मत मांडताना उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. 


नाना, सरकार हे फेसबुक लाईव्हवर बनवता येत नाही. म्हणून कोविड संपल्यावर आम्ही एकत्र आलो आणि फिजिकल सरकार स्थापन केलं, असं फडणवीस म्हणाले.