Exclusive : `राज म्हणाला, नानांनी नाक खुपसू नये..`, बाळासाहेबांची आठवण काढत नाना पाटेकर स्पष्टच म्हणाले...
Nana Patekar On Raj Thackeray : अभिनेते नाना पाटेकर आपल्या बेधडक राजकीय वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नाना पाटेकर यांनी आत्तापर्यंत अनेक नेत्यांना धारेवर धरलं आहे.
Nana Patekar On Raj Thackeray : अभिनेते नाना पाटेकर आपल्या बेधडक राजकीय वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नाना पाटेकर यांनी आत्तापर्यंत अनेक नेत्यांना धारेवर धरलं आहे. अशातच झी 24 तासला दिलेल्या एक्ल्युझिव्ह मुलाखतीत नाना पाटेकर यांनी राजकीय मुद्द्यांवर थेट उत्तरं दिली. त्यावेळी नाना पाटेकर यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलंय.
काय म्हणाले नाना पाटेकर?
मला शिवसेना फुटल्यावर वाईट वाटलं. कॅमेरा झाल्यानंतर मी नट असतो, नाहीतर मी सामान्य नागरिकच आहे. मी बाळासाहेबांपासून ते सर्वांशी माझं नात होतं. जयदेव, राज सर्वांशी होतं. आता परिस्थिती अशा झालीये की.. राजकारण वेगळं झालंय. आम्ही नागरिक म्हणून आता कोणाकडे पहायचं? तुमच्यामुळे आमच्या घरी चार मत पडतात, असं नाना पाटेकर म्हणतात. राजकीय परिस्थितीवर बोलताना नाना पाटेकर यांनी बाळासाहेबांची आठवण काढली.
बाळासाहेब मला फोन करून बोलायचे. गाढवा काय करतोस रे असं म्हणायचे... आता ते नातं तसं राहिलं नाही. माझं आणि राजचं बोलणं होतं. पण मी ते आधीसारखं राहिलं नाही. बाळासाहेब गेल्यानंतर मातोश्रीशी संबंध संपला. पहिल्यासारखं नातं आता राहिलं नाही, असं म्हणत नाना पाटेकर यांनी भावना व्यक्त केली आहे.
मी म्हटलं राज आणि उद्धव यांनी दोघांनी एकत्र यावं. पण तो काय म्हणाला, नानाला राजकारण कळत नाही, त्यांनी नाक खुपसू नये.. आणि मला खरंच राजकारण कळत नाही. त्यांचं रक्ताचं नात आहे. आले एकत्र तर काय झालं? असं नाना पाटेकर म्हणाले आहेत. शरद पवार एकेकाळी माझे हिरो होते. मात्र, आता राजकारण बदललं आहे, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.
नाना पाटेकर राजकारणात येणार का?
राजकारणातून समाजपरिवर्तन करावं, असं वाटत नाही का? असा सवाल विचारल्यावर नाना पाटेकर यांनी थेट उत्तर दिलं. आपल्याला ते जमणार नाही. आपण पटकन बोलून जातो, आपल्याला दुसऱ्या दिवशी हाकलून लावतील, असं नाना पाटेकर म्हणाले आहेत.
पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाला परंपरा होती. आधी कलाकारांची आणि राजकारणाची चांगली नाती असायची. आता तसं काही राहिलं नाही. आता एकाकडे गेलं तर दुसऱ्याला राग येतो, प्रत्येकाला समाधानी करू शकत नाहीत. मत मांडण्याची मानसिकता राहिली नाही. माझं माध्यम नाटक आणि सिनेमा देखील आहे, असं नाना पाटेकर म्हणाले. नाना पाटेकर यांचा ओले आले हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, त्यानिमित्त प्रमोशनदरम्यान नाना पाटेकर यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीवेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय.