कोकणात पुन्हा नाणार प्रकल्प आणणार - प्रसाद लाड
नाणार प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली.
रत्नागिरी : सर्वच पक्षांच्या नेतृत्वाच्या सहमतीने नाणार प्रकल्प आम्ही आणू, अशी माहिती भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नाणारचा मुद्दा गाजणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नाणारच्याबाबतीत लोकांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समजून घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत नाणार समर्थक लोकांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी जाहीर सभेत सांगितले होते की, नाणारचा पुनर्विचार केला जाईल. त्यामुळे लोकांना विकास हवा असेल तर नाणार पुन्हा आणण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली. यामुळे या मुद्द्यावरुन शिवसेना पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेना युती झाल्यानंतर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेले आहेत. रत्नागिरीत एकही मतदारसंघ न मिळाल्याने भाजपकडून बंडखोरी झाली होती. मात्र, भाजपच्या बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर सिंधुदुर्गात युती तुटल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली. भाजपकडून नितेश राणे यांना एबी अर्ज दिल्यानंतर शिवसेनेतून बंडखोरी झाली. शिवसेनेनेही बंडखोर उमेदवाराला एबी अर्ज दिला. त्यामुळे नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार आहे. त्यामुळे भाजपही आक्रमक भूमिका घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.