नाणार प्रकल्प : सुकथनकर समितीने गाशा गुंडाळला
नाणार प्रकल्पासाठी आलेल्या सुकथनकर समिताला अखेर आपला गाशा गुंडाळावा लागला आहे.
रत्नागिरी : नाणार प्रकल्पासाठी आलेल्या सुकथनकर समिताला अखेर आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. शिवसेनेचा आक्रमक पवित्रा पाहून समितीने आपले कामकाज थांबवले आहे. नाणार प्रकल्पासाठी प्रकल्पग्रस्तांची बाजू समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी सुकथनकर समिती रत्नागिरीत दाखल झाली होती. पाच सदस्यीय समितीचा दोन दिवसांचा रत्नागिरी दौरा होता. सुकथनकर समिती ही कंपनीने नियुक्त केलेली असल्याने ही समिती बेकायदेशीरच असल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला.
नाणार परिसरातील तब्बल आठ ग्रामपंचायतीचे सरपंचदेखील उपस्थित होते. सकाळी रिफायनरी समर्थकांची बाजू समितीने ऐकून घेतली. चांगला मोबदला मिळावा ही समर्थकांची मागणी होती. मात्र दुपारी सेनेसह नाणार रिफायनरी विरोधक चर्चेला आले. खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत, कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी आक्रमक पवित्रा घेत सुकथनकर समितीला कामकाज थांबवण्याची मागणी केली. सेनेचा आणि प्रकल्पग्रस्तांचा विरोध लक्षात घेता सुकथनकर समितीला काम थांबवून सभागृहातून काढता पाय घ्यावा लागला.
समिती जर कंपनीने नियुक्त केली असेल तर शासकीय जागा वापरण्याचा अधिकार दिला कोणी? असा प्रश्न विनायक राऊतांसह, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, अशोक वालम यांनी उपस्थित केला. नाणार प्रकल्पासंदर्भातली पाहाणी सुकथनकर समिती करत असताना आज नाणार परिसरातील तब्बल आठ ग्रामपंचयतीचे सरपंच देखील उपस्थित होते. सर्व सरपंचांनी समितीने आपले कामकाज स्थगित करावे, अशी मागणी यावेळी केली होती.