सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोवंश तस्कारांनी गोरक्षकांवर शस्त्रांनी हल्ला करत एका गोरक्षकाची हत्या केली. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी गोरक्षकांच्या गाडीचे टायरही धारदार शस्त्राने फोडले. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ इथं ही घटन घडली. शिवणी इथल्या गोरक्षक दलाचे कार्यकर्ते तेलंगणातील एका कार्यकमातून गावी परत येत होते. तेव्हा त्यांना एक संशयित बोलेरो पिकअप गाडी दिसली. गोरक्षकानी गाडी थांबवली असता गाडीतील हल्लेखोरांनी थेट त्यांच्यावर हल्ला चढवला. यात शेखर रामलु रापेल्ली हा गोरक्षक ठार झाला, तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले, गोरक्षक पळून जाऊ नये म्हणून हल्लेखोरांनी त्यांच्या कारचे टायरही धारदार शस्त्राने फोडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
गाडीत गोवंश तस्करी करण्याच्या संशयावरून गोरक्षकानी गाडीचा पाठलाग केल्याने गोरक्षकांवर हल्ला करण्यात आला. या हल्यात एका गोरक्षकाचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेले सहाजण जखमी झाले. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. किनवट तालुक्यातून तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी केली जाते. काल रात्रीच्या सुमारास तेलंगणातील एका कार्यक्रमातून परतणाऱ्या तरुणांना संशयास्पद गाडी दिसली. बोलेरो पिकअप गाडीतून गोवंश किंवा गोवंशाचे मांस तस्करी होत असल्याचा संशय गोरक्षकाना आला. त्यांनी आपल्या कारमधून त्या गाडीचा पाठलाग केला. 


अप्पारावपेठ जवळ गोरक्षकानी ती बोलेरो गाडी थांबवली. गाडी थांबवून विचारपुस करण्याआधीच गाडीतील तस्करांनी अचानक तरुणांवर हल्ला केला. धारदार शस्त्र, लाठ्या काठ्यानी हा हल्ला करण्यात आला. या हल्यात शेखर रामलू रापेल्ली या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.  हल्लेखोरांनी गंभीर जखमी झालेल्या शेखरला पुलावरून खाली फेकून दिलं. गोरक्षक पळून जाऊ नयेत म्हणून हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या गाडीचे टायर फोडून टाकले. अचानक हल्ला झाल्याने भांबावलेले गोरक्षक युवक कसेबसे आपला मित्र शेखरला गाडीत टाकून तसेच निघाले. 


शिवणी पर्यंत पोहोचेपर्यंत शेखर रापेल्ली याचा मृत्यू झाला होता. गंभीर जखमी झालेल्या सहा जणांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलं.  ही घटना पसरताच शिवणी, इस्लापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा पोलीस दाखल झाले. स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि इतर अधिकारी रात्रीपासून घटनास्थळी ठाण मांडून आहेत. रात्रीची वेळ असल्याने हल्लेखोर ओळखू आले नाही. घटनेत जखमी होण्यापासून वाचलेल्या एका युवकाच्या जबाबावरून पोलीसांनी हत्या आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. 


पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. रॅपिड ऍक्शन फोर्स, केंद्रीय रिझर्व्ह पोलिसांसह स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त शिवणी आणि इस्लापुर परिसरात तैनात करण्यात आलाय. दरम्यान ह्या गाडीचा पाठलाग गोरक्षक तरुण करत होते. त्या गाडीत गोवंश किंवा मांस नव्हते. शिवणी परिसरातील गोरक्षक नेहमीच तेलंगणात होत असलेली गोवंश तस्करी उघड करतात. त्याच रागातून हल्लेखोरांनी गोरक्षक तरुणांची पाळत ठेवून हे हत्याकांड केल्याचा विश्व हिंदू परिषदेच्या गोरक्षक दलाने केलाय. या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली असून घटनेचा तपास पोलीस करताहेत. दरम्यान विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू संघटना तर्फे उद्या बुधवारी नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे