सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड :  पोटच्या मुलाच्या हत्येची आईनेच सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यात उघडकीस आलाय. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड इथं ही घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

35 वर्षीय सुशील श्रीमंगले याचा मृतदेह काही दिवसांपूर्वी बारड महामार्गाजवळ आढळला होता. डोक्यावर जखम असल्याने त्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांना होता. त्या दृष्टीने बारड पोलीसांनी तपास सुरू केला. 


मृत सुशील याच्या घरात असणाऱ्या भाडेकरुवर पोलिसांनी संशय होता. याप्रकरणी पोलिसांनी राजेश पाटील आणि देवराव भगत या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. आधी त्यांनी उडावाउडवीची उत्तरं दिली. पण पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी आपला गुन्हा कबूल केला.


मयत सुशीलच्या आईने खून करण्याची सुपारी दिल्याचं आरोपीनी सांगितलं. आरोपींनी दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी मृत सुशीलची आई शोभाबाई श्रीमंगले हिला अटक केली. मुलगा दारूसाठी त्रास देऊन मारहाण करत असल्याने आईने कंटाळून अखेर आपल्या पोटच्या मुलाच्या हत्येची सुपारी दिली . 


दारू पिण्यासाठी मुलगा नेहमी त्रास द्यायचा , शिवीगाळ करून मारहाण करायचा त्यामुळे या त्रासाला कंटाळून हत्येची सुपारी दिल्याची कबुली शोभाबाई यांनी पोलिसांना दिली . हत्येसाठी 60 हजार ठरले होते त्यापैकी 10 हजार रुपये शोभाबाई यांनी मारेकऱ्याना दिले होते.