आईसोबत अनैतिक संबंधांचा राग आणि अपघाताच बनाव... तरुणाच्या हत्येने नांदेडमध्ये खळबळ
Crime News : सुरुवातीला हा अपघात असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. मात्र शवविच्छेदनानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून हत्येचे कारण शोधून काढले आहे
Crime News : तरुणाची हत्या करुन अपघाताचा बनाव रचण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये (Nanded News) समोर आला आहे. पोलिसांची दिशाभूल करुन तरुणाची हत्या करुन तो इमारतीच्या गच्चीवरून पडल्याचे भासवण्यात आले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केल्यानंतर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नांदेड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने तपास करुन दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नांदेड शहराच्या श्रीनगर भागातील महारुद्र हनुमान मंदिर भागात हा सर्व प्रकार घडला आहे. नांदेडच्या पोलीस पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या राधेश्याम अग्रवाल (23) या युवकाच्या पोटात चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. खुनानंतर या राधेश्यामला एका इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकून देण्यात आले आणि हा अपघात असल्याचे भासवण्यात आले. मात्र वैद्यकीय अहवालानंतर राधेश्यामच्या पोटात धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याचे समोर आले.
राधेश्याम अग्रवालला एका व्यक्तीने दत्तक घेतले होते. मात्र दत्तक घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने राधेश्याम त्याच व्यक्तीच्या घरी भाड्याने राहत होता. 7 फेब्रुवारी रोजी राधेश्याम इमारतीच्या छतावर झोपलेला असताना तिथे आलेल्या आकाश पालिमकर आणि आदिनाथ पालिमकर या दोघांना त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि त्याला खाली फेकून दिले. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी राधेश्यामचा मृत्यू झाल्याचे समोर आले. इमारतीवरुन पडून राधेश्यामचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.
पोलिसांनी राधेश्यामचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला होता. मात्र शवविच्छेदनानंतर धक्कादायक माहिती समोर आली. राधेश्यामच्या पोटात शस्त्राने वार करण्यात आल्याचे अहवालातून समोर आले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि आकाश आणि आदिनाथ पालिमकर यांना सीसीटीव्हीच्या आधारे ताब्यात घेतले. दोघांनीही हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
का केली हत्या?
अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एका आरोपीला राधेश्याम याचे आपल्या आईसोबत अनैतिक संबंध आहेत असा गैरसमज झाला होता. याच संशयातून दोघांनी राधेश्यामला संपण्याचा निर्णय घेतला. 7 फेब्रुवारीच्या रात्री दोघांनी राधेश्यामवर सपासप वार करुन त्याला इमारतीच्या छतावरुन खाली फेकले. दोघांनाही हा अपघात भासवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांना तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली.