वणवाsss! 50 रुपयांत अश्लील डान्स; जत्रेत भर स्टेजवर घडणारा प्रकार पाहून हादराल
नांदेडच्या प्रसिद्ध माळेगाव यात्रेत बॉम्बे डान्सच्या नावाखाली अश्लील नृत्य, पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असतानाही कारवाई नाही
सतीष मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील माळेगावमध्ये सुरू असलेल्या यात्रेत बॉम्बे डान्सच्या नावाखाली अश्लील नृत्य केलं जात आहे. माळेगाव यात्रेत 7 ते 8 ठिकाणी शेड्स उभारून बॉम्बे डान्स सुरू आहे. 50 रुपयांना या डान्सचं तिकीट असून 50 रुपयात 3 गाणी दाखवण्यात येतात. मात्र नृत्य करणाऱ्या महिला अश्लील हावभाव करताना दिसतात. मराठी, हिंदी गाण्यांवर हा डान्स सुरू आहे. काही महिला ह्या तोकड्या कपड्यांवर अश्लील हावभाव करताना दिसताहेत. माळेगाव यात्रेला 22 डिसेंबर पासून सुरुवात झालीये. पहिले 3 दिवस हा बॉम्बे डान्स सुरू नव्हता. पण काल रात्री अचानक बॉम्बे डान्सचं आयोजन करण्यात आलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजन पोलीस चौकी पासून अगदी 100 मिटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे अनेक पोलीस कर्मचारी ही हा डान्स बाहेरून पाहत असताना दिसून आलं. अश्लील नृत्य सुरू असताना पोलिसांनी कारवाई का केली नाही हा प्रश्न या निमित्ताने पुढे आलाय.
बॉम्बे डांस चा इतिहास
माळेगाव यात्रेत 2010 पासून 'बॉम्बे डान्स' हा प्रकार सुरू झाला. माध्यमांमध्ये याच्या बातम्या आल्यानंतर 2010 साली 'बॉम्बे डान्स' वर कारवाई करत पोलीसांनी तो बंद पडला होता. त्यांनतर प्रत्येक वर्षी या डान्सला परवानगी देण्यावरून वाद निर्माण होत असतो. हवश्या, गवश्या, नवस्यांची यात्रा म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे. त्यामुळे या यात्रेत बॉम्बे डान्सला परवानगी देण्याची मागणी राजकारण्यांकडून होत असते. बॉम्बे डान्सला पोलीस परवानगी नसली तरी यात्रेतील एखादा दिवस हा कार्यक्रम होतोच. यंदाही पोलीसांनी बॉम्बे डान्सला परवानगी दिली नाही. मात्र रविवारी एक दिवस हा बॉम्बे डान्स सुरू होता.
श्री क्षेत्र खंडोबाची यात्रा
माळेगाव यात्रेला साडेतीनशे वर्षांचा इतिहास आहे. साडेतीनशे वर्षांपासून ही यात्रा दरवर्षी भरत असते. माळेगाव इथं खंडोबाचे मंदिर आहे. लाखो भाविकांचे हे मंदिर श्रध्दास्थान आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे हे कुलदैवत आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या यात्रेला वैभव प्राप्त झालं. साडेतीनशे वर्षांपूर्वी दक्षिण भारतात व्यापार करण्यासाठी जाणाऱ्या व्यापाऱ्यांचा हा मार्ग होता. व्यापारी माळेगाव इथं थांबत होते. तेव्हापासून या यात्रेला सुरुवात झाली. देशभरातील व्यापारी इथे व्यापारासाठी येत असतात. प्राण्यांच्या व्यापारासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. श्वाना पासून ते उंटापर्यंतची विक्री या यात्रेत होत असते. नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवर ही यात्रा भरत असते. त्यामुळे मराठवाड्यातून लाखो भाविक या यात्रेत सामील होत असतात.