मोबाईलवर गेम खेळताना स्फोट, चिमुकल्याची ३ बोटं तुटली
तुमचा मुलगा किंवा मुलगी मोबाईलवर गेम खेळत असतील तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी.
नांदेड : तुमचा मुलगा किंवा मुलगी मोबाईलवर गेम खेळत असतील तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी. गेम खेळताना मोबाईलचा स्फोट झाला. आणि या स्फोटात ८ वर्षाच्या चिमुकल्याच्या हाताची ३ बोटं तुटली. प्रशांत जाधव असं या मुलाचं नाव आहे. नांदेडमधल्या मुखेड तालुक्यातल्या कमलातांडा इथे ही घटना घडली आहे.
आयकॉल के-७२ असं या मोबाईलचं नाव आहे. महिन्याभरापूर्वीच श्रीपाद जाधव यांनी जाहिरात पाहून कंपनीशी संपर्क साधून हा मोबाईल मागवला होता. या मोबाईलच्या जाहिरातीप्रमाणे दीड हजार रुपयाला ३ मोबाईल आणि १ घड्याळ अशी ऑफर असल्यामुळे जाधव यांनी हा मोबाईल मागवला. महिन्याभरापासून श्रीपाद जाधव तो मोबाईल वापरत होते. पण आज त्यांचा मुलगा प्रशांत या मोबाईलमध्ये गेम खेळत होता. अचानक या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. मोबाईल डाव्या हातात असल्यामुळे प्रशांतच्या डाव्या हाताची बोटं तुटली, एवढच नाही तर त्याचा तळहातही निकामी झाला आहे.
प्रशांत जाधवला प्राथमिक उपचारानंतर उदगीरला हलवण्यात आलं आहे. उदगीरच्या खासगी दवाखान्यात प्रशांतवर उपचार सुरु आहेत. या स्फोटाचे काही तुकडे प्रशांतच्या छाती आणि पोटावरही लागले होते.