सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : मुलीला भेटून दुचाकीवरुन परतणाऱ्या एका बापाचा नांदेडमध्ये (Nanded News) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलीला भेटून परतणाऱ्या पित्याला ट्रकने धडक दिली. या धडकेत पित्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मुलीचा चेहरा पाहिल्याच्या आनंदात हा पिता घरी परतत होता. मात्र ट्रकचालकाने त्याला चिरडलं. या दुर्दैवी घटनेत महिन्याभरापूर्वीच बाप बनलेल्या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवीण रामराव पवार (25) असं या अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव आहे. महिनाभरापूर्वी जन्मलेल्या आपल्या मुलीला भेटून घरी परतणाऱ्या प्रवीणच ट्रकच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्री नांदेड अर्धापूर रोडवर पिंपळगाव जवळ ही दुर्दैवी घटना घडली. 25 वर्षीय प्रवीण पवार हा अर्धापूर तालुक्यातील अमराबाद तांडा येथील रहिवासी आहे. तीन वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याला दोन मुलीदेखील आहे. महिन्याभरापूर्वीच त्याला मुलगी झाली होती. प्रवीण पवार हा रविवारी महिन्याभरा पूर्वी जन्मलेल्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी वडगाव येथे सासरवाडीला गेला होता. त्यानंतर घरी परतत असताना प्रवीणचा मृत्यू झाला.


पत्नी आणि मुलीला भेटून प्रवीण परत दुचाकीवर आपल्या गावाकडे निघाला होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव जवळ पाठीमागून आलेल्या ट्रकने त्याला चिरडले. या दुर्घटनेत प्रवीणचा जागीच मृत्यू झाला. प्रवीणच्या गाडीला धडक दिल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला होता. घटनेनंतर पसार झालेल्या ट्रक चालकाला अर्धापूर पोलिसांनी गस्त लावून ताब्यात घेतले आहे. या घटनेने पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकात बुडाले आहे.