COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतीश मोहिते, झी २४ तास, नांदेड : गावातल्या देशी दारूच्या गुत्त्यामुळं पुरूष मंडळी व्यसनाधीन झाल्याचं आपण पाहतो. पण नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला... इथं चक्क शालेय विद्यार्थ्यांनाच दारुचं व्यसन लागलंय. त्यामुळं देशी दारू दुकान बंद करण्यासाठी गावातील महिलांनी मोर्चा उघडलाय.


नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील नायगाव हे अख्खं गावच व्यसनाधीन होत चाललंय. पुरूष मंडळी दारूच्या आहारी गेलीच आहेत. पण शाळकरी विद्यार्थ्यांनाही दारूचं व्यसन लागलंय. इयत्ता चौथीतली मुलं देखील देशी दारू पित असल्याची धक्कादायक बाब उघड झालीय. ही शाळकरी मुलं दहा-दहा रुपये गोळा करून देशी दारू पित असल्याचं गावातील महिलांनीच सांगितलं.



महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर नायगाव आहे. तेलंगणापेक्षा इथं स्वस्त दारू मिळत असल्यानं सकाळपासूनच गावातल्या देशी दारुच्या दुकानावर जत्रा भरते. त्याचा त्रास महिलांना सोसावा लागला. शिवाय दारुच्या व्यसनामुळं कौटुंबिक कलह वाढल्यानं हे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी धर्माबाद तहसील कार्यालयावर मोर्चाही काढला.


शालेय विद्यार्थ्यांना दारुचं व्यसन लागावं, ही फारच गंभीर बाब आहे. आधीच कोरोनामुळं शाळा बंद पडल्यात. त्यात दारुच्या व्यसनामुळं देशाची भावी पिढी बरबाद होतेय. त्यामुळं इथं बाटली आडवी व्हायलाच हवी.