Whatsapp Group च्या माध्यमातून लोकवर्गणी, उभारले 50 बेड्सचे मोफत कोविड सेंटर
50 बेड्सचे मोफत कोविड सेंटर सुरु केलंय
सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : सध्याच्या युगात प्रत्येकजण व्हाट्सएपवर आलाय आणि प्रत्येकाचा व्हॉट्सएप ग्रुप बनलाय. या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. पण नांदेडमधल्या व्हाट्सएप ग्रुपने आवाहन मोठं समाजकार्य यामाध्यमातून केलंय. व्हॉट्सएपच्या माध्यमातून लोकवर्गणी जमा केली आणि 50 बेड्सचे मोफत कोविड सेंटर सुरु केलंय.
नांदेड जिल्ह्यातील नायगांव मध्ये हे मोफत कोविड सेंटर सुरु करण्यात आलंय. नायगावमधल्या व्हाट्सएप ग्रुपच्या सदस्यांनी एकत्रित येत ही कल्पना मांडली आणि त्याला नायगांव शहरातील सर्वानी सहकार्य केले.
कोरोना रुग्णांना उपचारासाठी नांदेडला नेल्याशिवाय पर्याय न्हवता. त्यामुळे नायगावमध्ये कोविड सेंटर ची नितांत गरज होती. काही युवकानी पुढाकार घेतला आणि नायगांवमध्ये पन्नास बेडचे कोव्हिड सेंटर उभारण्यात आले. ऑक्सीजनची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. सध्या या कोविड सेंटरमध्ये 27 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांना नाश्ता, जेवणसुद्धा मोफत देण्यात येतंय.
विशेष म्हणजे नायगांवचे स्थानिक डॉक्टर मोफतपणे या कोविड सेंटरवर येऊन रुग्णसेवा करतायत. नायगावच्या युवकांनी सरकारच्या कुठल्याही मदतीशिवाय लोकसहभागातून हे सेंटर उभारल्यानं त्यांचं सर्व स्तरातून कौतूक होतोय.