मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी आधीच केली होती. त्यांनी सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातून चिरंजीव नीलेश राणे यांची उमेदवारी आधीच जाहीर केली होती. आता राणे यांनी आपल्या पक्षाचा दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. नारायण राणे यांनी औरंगाबादमधून सुभाष किसनराव पाटील हे स्वाभिमान पक्षाकडून लोकसभा लढवतील, असे जाहीर केले आहे. राणे यांनी भाजपविरोधात उमेदवार देणार नाही, असे याआधीच जाहीर केले आहे. मात्र, शिवसेनेविरोधात आपले उमेदवार असतील असे स्पष्ट केले होते. त्यामुळे मराठवाड्यात शिवसेनेविरोधात स्वाभिमानचा असणार आहे, हे या उमेदवारीवरुन स्पष्ट झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादचं राजकारण पाहता सुभाष पाटील निवडून येतील असा दावा राणे यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव करणारच असे राणे म्हणाले आहे. जिथं जिथं शिवसेना आहे तिथं स्वाभिमान पक्ष निवडणूक लढवणार, राज्यात किमान पाच जागा लढवणार असल्याची घोषणा राणे यांनी केली आहे. स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत असे समजायला हरकत नाही, असेही राणे म्हणाले.


यावेळी राणे यांनी शिवसेना भाजप युतीवर सुद्धा टीका केली. भाजप - शिवसेना युती फक्त सत्ता मिळवण्यासाठी आहे. तुझं माझं जमेना, तुझ्या विना करमेना असे झाले आहे. पाहिल्या शिव्या दिल्यात आणि आता जवळ काय तर जवळ आलेत. शिवसेनेने काहीही काम केले नाही. आता सत्तेसाठी फक्त युती केली, असा टोला राणे यांनी लावला.  आचारसंहिता जाहीर झाल्यावर इतर उमेदवार सुद्धा घोषित करू, असे राणे म्हणालेत.