मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आणि भाजप पुरस्कृत खासदार नारायण राणे यांनी आत्मचरित्र लिहणार असल्याचे जाहीर केले आहे. नारायण राणे यांचा मुलगा नितेश यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली.  'अब आएगा मजा, सबका हिसाब होगा', असा मथळा लिहून नितेश यांनी ट्विट केले आहे. माझे वडील आणि मार्गदर्शक, लवकरच त्यांचे स्वलिखीत आत्मचरित्र प्रसिद्ध होत असल्याचे नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. नितेश यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राणे यांच्या आत्मचरित्रात कोणते गौप्यस्फोट होणार, याविषयीही अनेकांना उत्सुकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेतील फायरब्रँण्ड नेते ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व्हाया काँग्रेस असा राजकीय प्रवास असणारे नारायण राणे नेहमीच महाराष्ट्रातील राजकारणात केंद्रस्थानी राहिले आहेत. आघाडीची सत्ता असताना त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली होती. यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर राणे राज्यसभेवर निवडून गेले होते. मात्र, शिवसेना-भाजप यांची युती झाल्यानंतर राणे पुन्हा एकाकी पडले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते स्वबळावर रिंगणात उतरले आहेत.