कोकणात सेनेविरूद्ध लढणाऱ्या तटकरेंना राणेंचा पाठींबा
अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांचा पाठींबा आहे. तर शिवसेनेची गणितं भाजपच्या पाठींब्यावर अवलंबून आहेत.
रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण मतदार संघासाठी निवडणूक होत आहे. शिवसेनेचे राजीव साबळे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे रिंगणात आहेत. अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांचा पाठींबा आहे. तर शिवसेनेची गणितं भाजपच्या पाठींब्यावर अवलंबून आहेत. या एका जागेसाठी एकूण 941 मतदार मतदान करणार असून 471 चा आकडा पार करण्यासाठी जोरदार घोडेबाजार सुरु आहे. 941 पैकी शिवसेनेकडे 309 मतं ,भाजपकडे 145 मतं, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शेकापकडे 275 मतं आहेत. तर स्वाभिमान पक्षाकडे 91, मनसे 13 आणि उर्वरित- अपक्ष 108 मतं आहेत.सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप खरोखरच शिवसेनेला मदत कितपत करेल याबाबत शंकाच आहे. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचं पारडं जाड मानलं जात आहे.
२४ ला मतमोजणी
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी आज मतदान होत असून, 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होतेय. उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघातल्या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अशोक जगदाळे यांच्यात ही लढत होतेय. या ठिकाणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.