सिंधुदुर्ग : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी एनडीएत जाण्याची घोषणा केलीय. सिंधुदुर्गमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी ही घोषणा केलीय. मात्र मंत्रिपदाबाबत भाजपकडून ऑफर आल्यानंतरच निर्णय घेणार असल्याचं राणेंनी सांगितलं. 2019 पर्यंत केंद्रात जाणार नसल्याचं राणेंनी स्पष्ट केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच 2019च्या निवडणुकीबाबतही अजून निर्णय घेतलेला नसल्याचं राणेंनी सांगितलं. राणेंचा पक्ष आता एनडीएत दाखल झाल्यामुळे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या शिवसेना आणि राणेंना एकाच मांदियाळीत बसावं लागणार आहे.


दरम्यान राज्यात अनेक दिवस रखडलेला मंत्रीमंडळ फेरबदल दिवाळीनंतरच होण्याची चिन्हं आहेत. भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे फेरबदल करताना नारायण राणेंना मंत्रीमंडळात स्थान दिले जाणार आहे.


राणेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राणेंना एनडीएमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र भाजपातील सूत्रांच्या माहितीनुसार राणेंना कोणतं खातं द्यायचं हे अद्याप निश्चित झालेलं नाही. राणेंनी भाजपाकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण यापैकी एक खातं मागितलं आहे. मात्र भाजपाने अद्याप कोणतं खातं द्यायचा याचा निर्णय घेतलेला नाही.


दुसरीकडे राज्यमंत्रीमंडळात मोठे फेरबदल होणार असून आतापर्यंत ज्या आमदारांना संधी मिळाली नाही, त्यांना या फेरबदलात संधी मिळेल असं भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मंत्रीमंडळ फेरबदल करताना अनेक विद्यमान मंत्र्यांना वगळलं जाणार आहे. वादग्रस्त ठरलेले आणि परफॉर्मन्स दाखवू न शकलेल्या मंत्र्यांना या फेरबदलातून वगळलं जाणार असल्याची चर्चा आहे.