नारायण राणेंना काँग्रेसमध्ये घेण्याचा प्रस्ताव नाही, चर्चांना पूर्णविराम
नारायण राणे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची वृत्त सोमवारी विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते.
मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेस पक्षात घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव अद्याप आपल्याकडे आलेला नाही. बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्याबाबत आलेल्या बातम्या देखील चुकीच्या असून, अशाप्रकारे आपण काही बोललोच नाही, असा खुलासा त्यांनी आमच्याकडे केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी दिली. ते सावंतवाडीत बोलत होते. अशोक चव्हाण यांच्या या प्रतिक्रियेमुळे राणेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चाना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.
नारायण राणे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची वृत्त सोमवारी विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. लोकसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राज्यात विविध हालचालींना वेग आला आहे. त्यातच बाळासाहेब थोरातांच्या हवाल्याने नारायण राणे काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे वृत्त आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात झाली. या बैठकीला नारायण राणे उपस्थित होते. नारायण राणे हे भाजपच्या पाठिंब्यावरच राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांनी स्वतःच्या महाराष्ट्र स्वाभीमानी पक्षाची स्थापना केली आहे. आपला पक्ष राज्यात निवडणुका लढविणार असल्याचे राणे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्याचवेळी शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्यास आपण भाजपसोबत जाणार नाही, असेही राणे यांनी स्पष्ट केले होते. कोकणातील नाणार प्रकल्पावरून नारायण राणे यांनी भाजपवर टीका केली होती.
डिसेंबरमध्ये निकाल लागलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसल्यामुळे आता काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यांची लोकसभा निवडणुकीआधी घरवापसी करण्यासाठी काँग्रेस पक्ष उत्सुक आहे. अशातच नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परततील, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटल्यामुळे सगळ्यांचे लक्ष याकडे लागले होते.