नाशिक, नंदुरबार जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले, पुरती दाणादाण
Heavy rain in Nashik, Nandurbar district : देवळा तालुक्यातल्या वासोळसह गिरणा नदी काठच्या देवळा, सटाण्यात पावसाने झोडपले. शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावा लागणार आहे.
नाशिक : Heavy rain in Nashik, Nandurbar district : देवळा तालुक्यातल्या वासोळसह गिरणा नदी काठच्या देवळा, सटाण्यात पावसाने झोडपले. तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये काल दुपारी आणि सायंकाळी पावसानं दमदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावलाय. हा पाऊस खरीपासाठी लाभदायक आहे. त्यामुळे परिसरातल्या पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे. बियाणं खरेदीलाही गर्दी होतेय. यंदा बियाण्यांच्या किंमतीत 50 ते 70 रुपयांनी वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावा लागणार आहे.
वादळी वाऱ्यासह रात्रीच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसानं मालेगावमध्ये पुरती दाणादाण उडवून दिली. सुमारे अर्धा ते पाऊण तास धुव्वाधार पावसामुळे मालेगावच्या आझाद नगर भागासह अनेक रस्त्यावर पाणी साचले होते. पूर्व भागातील काही झोपडपट्ट्यांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.त्यामुळे पहिल्याच पावसात महापालिकेच्या नालेसफाईचे पितळ उघडे पडले.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कॅम्प व रावळगाव नका परिसरात झाडे उन्मळून पडल्याने विजांच्या तारा तुटून अनेक भागातील विज पुरवठा खंडित झाला. युद्ध पातळीवर काम सुरु होते. रात्रीच्या अंधारात काम करतांना अडचणी येत होत्या. रात्री उशिरा काही भागात विज पुरवठा सुरळीत झाला तर अनेक ठिकाणी रात्रभर विज पुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली. सोयगाव परिसरात गाडीवर झाड पडून नुकसान झाले.
नंदुरबारमध्ये पावसाची दमदार हजेरी
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र हा पाऊस फळबागांसाठी कर्दनकाळ ठरलाय. केळी आणि पपईच्या बागांचं मोठं नुकसान झालंय. केळीचे खांब कोलमडले तर शेतांमध्येही पाणी साचले. कापूस उत्पादकांचंही मोठं नुकसान झालं. जिल्ह्यात जवळपास 500 घरांचं नुकसान झाले आहे.
शहादा तालुक्यात दलेरपूर, सुलतानपूर शिवारात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या केळी बागा आणि घरांचे पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.