नाशिकमध्ये अपघातानंतर कारचा चुराडा; माजी भाजपा नगरसेवकासह चौघांचा मृत्यू
Nashik Accident : नाशिकच्या चांदवडमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील नमोकार तीर्थक्षेत्रा समोर हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये धुळ्यातील माजी नगरसेवकाचा देखील मृत्यू झाला आहे.
Nashik News : नाशिकच्या (Nashik Accident) चांदवडमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झालाय. चांदवडमध्ये (Chandvad) कार-कंटेनरमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. अपघातात कारमधील चौघांचाही मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. सुरुवातीला या अपघातातील मृतांची ओळख देखील पटत नव्हती. मात्र या अपघातात धुळ्याचे (Dhule) भाजपाचे (BJP) माजी नगरसेवक किरण अहिरराव यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
चांदवड येथील नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर वडणेरभैरव पोलीस, सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचले होते. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता. अपघातातील सर्व मृत हे धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. चौघेही जण नाशिककडून धुळे येथे चालले होते. मृतांमध्ये धुळ्याचे भाजपाचे माजी नगरसेवक किरण अहिरराव यांचा देखील समावेश आहे.
किरण हरीचंद्र अहिराव, अनिल विष्णू पाटील, कृष्णकांत चिंधा माळी, प्रवीण मधुकर पवार अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणले आहेत. या अपघातानंतर पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले आहे.
खड्डा चुकवण्याच्या नादात विद्यार्थ्याचा मृत्यू
नाशिकच्या वडनेरभैरव शिरवाडे वणी रस्त्यावर खड्डा चुकवण्याच्या नादात समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने धडक बसून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. स्कूल बस-दुचाकीमध्ये ही जोरदार धडक झाली आहे. या धडकेत गंभीर जखमी दुसऱ्या विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत. वडनेरभैरव पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडनेरभैरव येथील चेतन रवींद्र निकम व तेजस संजय निकम हे विद्यार्थी बाईकने सकाळी सातच्या सुमारास हे बहिणीला महाविद्यालयात सोडण्यासाठी निघाले होते. नेहमीप्रमाणे बहिणीला बस थांब्यावर सोडून दोघेही मोहाडीकडे जात होते. त्याचवेळी वडनेरभैरव-शिरवाडे वणी रस्त्यावरील खड्डा चुकवताना समोरून येणाऱ्या स्कूल बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोघेही रस्त्यावर पडले. यात चेतनच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर तेजस हा गंभीर जखमी झाला.