नाशिक :  राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) संजय राऊतांना (Sanjay Raut) आचार्य अत्रेंची उपमा देत शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यात राऊतांचे मोठे योगदान असल्याचं नमूद केले. नाशिक जिल्हा प्रशासकीय इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्तानं ग्रामीण विकासमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना खासदार संजय राऊत एकाय मंचावर आले. यावेळी ते  बोलत होते. दरम्यान, विरोधी पक्षात जास्त आनंद असतो हे सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना समजावले , तर सरकार आणि विरोधी पक्ष पाच वर्षे आनंदात राहतील असा टोला राऊतांनी देवेंद्र फडवणीस यांना लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र विकासआघाडी सरकारमधील मंत्री  छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांचे कौतुक करत स्तुतिसुमने उधळली. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, असं संजय राऊत पहिल्यापासून सांगत होते. ते खरं झाले. त्यांनी शिवसेनेला आत्मविश्वास दिला. त्यामुळे ते शक्य झाले. ५० वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अत्रे म्हणायचे. होणारच, झालाच पाहिजे. त्यांचा तो मराठा आणि ते म्हणायचे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होणारच, तसाच प्रयत्न राऊत यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केला. राऊत आणि सामना असे समीकरण होते. राऊतांचे काम आचार्य अत्रे यांच्यासारखे आहे, असे भुजबळ म्हणाले. मंत्री झाल्यानंतर हा माझा पहिला कार्यक्रम आहे. अध्यक्ष म्हणून राऊत यांच्या माध्यमातून चांगली व्यक्ती मिळाली, असे सांगायलाही छगन भुजबळ विसरले नाहीत. संयुक्त महाराष्ट्राची ती मोठी लढाई होती. आजचीही लढाई तशी सोपी नव्हती. ती आपण जिंकली आहे. त्यांनी सगळ्यांना हिम्मत दिली. ही लढाई राऊतांमुळे शक्य झाली आहे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे, असे कौतुक भुजबळ यांनी राऊतांचे केले.


त्याचवेळी आपण सरकारी कामांत हजेरी लावत नाही. आज योगायोग आहे. मी नाशिकमध्ये होतो. भुजबळ यांना मी सांगू ईच्छितो, मी कधी शासकीय कामांना जात नाही. आज सुद्धा इतक्या वर्षातील माझा हा पहिला कार्यक्रम नाशिकचा. उदय सांगळे यांचा आग्रह होता. मात्र, मला माहिती नव्हते हा शासकीय कार्यक्रम. सरकार एकीकडे आम्ही दुसरीकडे असतो. ज्या दिवशी सरकाल बनले त्यादिवशी आम्ही विरोधी पक्षामध्ये असतो. विरोधी पक्षात काय मजा असते, ते भुजबळ यांना जास्त माहित आहे. हाच धागा पकडत भाजपला टोला लगावला. भुजबळांनी विरोधी पक्षात जास्त आनंद असतो हे सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना समजावले , तर सरकार आणि विरोधी पक्ष पाच वर्षे आनंदात राहतील असा टोला राऊतांनी देवेंद्र फडवणीस यांना लगावला. 



नाशिकला अनेक विकास कामे २०१४ पूर्वी अंमलात आणली आहेत. जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे कामही लवकर होण्यासाठी प्रयत्न करणार, असे भुजबळ म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. नाशिकमध्ये दीड हजार कोटी रुपयांपर्यंत निधी मिळणार आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेच पाहिजेत, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी याची काळजी घ्यावी, अशी सूचना भुजबळ यांनी यावेळी केली.