नाशिक : राज्यात  पुढचे 5 दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. तापमानात 3 ते 5 अंशांनी घट होऊ शकते असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. थंडीनं अख्खा महाराष्ट्र गारठला त्यात अवकाळी पावसाचा तडाखाही बसला आहे. या हिवसाळ्यामुळं शेतकरी प्रचंड हैराण झाले आहेत. रब्बी पिकांना धोका निर्माण झालं आहे. त्यात द्राक्षबागा सांभाळण्यासाठी चक्क शेकोट्या पेटवण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागानं महत्त्वाचा इशारा दिला आहे.उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात शीत लहर येणार आहे.  शीत दिनाचा देखील इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं दिला आहे. शीत दिन म्हणजे एखाद्या भागाचं किमान तापमान 10 अंशापेक्षा कमी आणि कमाल तापमान नॉर्मल तापमानाच्या 4.5 ते 6.4 अंशाने घसरल्यास त्याला शीत दिन म्हणतात. 



थंडीची हुडहुडी भरली की, शेकोट्या पेटतात. पण पिंपळगाव बसवंतमधली ही शेकोटी जरा वेगळी आहे. कडाक्याच्या थंडीनं द्राक्षपंढरी निफाड गारठून गेली आहे. द्राक्षमणी फुटून तडे जात असल्यानं द्राक्ष उत्पादकांचं नुकसान होत आहेत. थंडीच्या कडाक्यातून द्राक्षांचा बचाव करण्यासाठी पहाटे उटून अशा शेकोट्या पेटवाव्या लागत आहे.


नाशिक आणि धुळ्यामध्ये महाबळेश्वरपेक्षा कडाक्याची थंडी पडली आहे. निफाड, धुळ्यामध्ये 4.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. नाशिकमध्ये 6.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान खाली घसरलंय. तर महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा 7 अंशांवर गेला. राज्यात पुढील 5 दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तापमानात 3 ते 5 अंशांनी घट होऊ शकते असा इशारा हवामान खात्यानं दिला. या कडाक्याच्या थंडीमुळे पिकांना मोठा फटका बसू शकतो. 


निसर्गाच्या चक्रात शेतकरी पुरता अडकून गेला. अवकाळीच्या तडाख्यातून वाचलेली पिकं आता थंडीमुळं वाया तर जाणार नाहीत ना, अशी चिंता शेतक-यांना सतावत आहे. या आस्मानी संकटातून कधी सुटका होणार, याची बळीराजा वाट पाहत आहे.