जेवण बनवत असतानाच पतीने केली पत्नीची हत्या; समोर आलं धक्कादायक कारण
Nashik Crime : नाशिकमध्ये पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीला संपवल्यानंतर पतीने स्वतःला देखील संपवलं आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.
निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : नाशिकमधून (Nashik Crime) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या सुरगणा तालुक्यातील एका गावात पतीने पत्नीची हत्या करुन स्वतःला संपवलं आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पत्नी वर कुऱ्हाडीने वार करून तिची निघृण हत्या केल्यानंतर घरातून पळ काढत पतीने आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Nashik Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या करत स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन गावात समोर आली आहे. जयवंता दळवी व मनोहर दळवी असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पत्नी आणि पतीचे नाव आहे. मुलाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र तपास केला असता पतीने देखील आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे.
आरोपीचा मुलगा लक्ष्मणने दिलेल्या फिर्यादीवरून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. "मनोहरला दारूचे व्यसन होते. मनोहर हा दररोज दारू पिऊन आल्यानंतरतर आईसोबत वाद घालायचा. दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून नेहमीच वाद होत असत. दोघे एकमेकांना वारंवार शिवीगाळ करत असत. एक सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आई चुलीवर स्वयंपाक करीत असतांना दोघांमध्ये भांडण झाले त्याच वेळी वडिलांनी घरातील कुऱ्हाडीने आईच्या मानेवर उजव्या बाजूला कुऱ्हाडीने वार करत गंभीर जखमी केले. त्यानंतर मनोहरने तिथून पळ काढला. आई चुली जवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. घरात रक्ताचा सडा पडला होता," असे लक्ष्मणने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.