सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : तीन दिवसांपूर्वी नाशिकच्या (Nashik Crime News) मखमलाबाद पेठरोड लिंक रोडवरील पाटालगत एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. 19 ते 20 वयोगटातील असलेल्या या तरुणाचा दगडाने ठेचून खून (Crime News) करण्यात आला होता. पोलिसांकडून (Nashik Police) गेल्या दोन दिवसांपासून तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरु होते. मात्र कोणताही पुरावा हाती लागत नव्हता. अखेर मृत तरुणाची ओळख पटली असून त्याच्या हत्येचे कारणही समोर आले आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या शरदचंद्र पवार मार्केट ते मखमलाबाद लिंक रोड येथील नाल्यात ऋषिकेश भालेराव (19) या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मयत ऋषिकेश भालेराव असे सातपूर येथील रहिवासी होता. ऋषिकेशने आरोपींकडे दारुसाठी पैसे मागितल्याने त्यांच्यात वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि त्यातूनच हा खून झाला. आरोपींनी रागाच्या भरात ऋषिकेशचा दगडाने ठेचून खून केला आणि त्याचा मृतदेह मखमलाबाद लिंक रोड येथील नाल्यात फेकून दिला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सखोल तपास करत पोलिसांनी ऋषिकेशची ओळख पटवली आणि आरोपींपर्यंत पोहोचत त्यांना ताब्यात घेतले आहे.


नेमकं काय झालं?


शनिवारी दोघे अल्पवयीन आरोपी हे आपल्या मित्राला सातपूर येथे सोडण्यासाठी गेले होते. तेथून रात्री परतत असताना पावणे बाराच्या सुमारास असताना  ऋषिकेशने त्यांच्याकडे पंचवटी परिसरातील हमालवाडी पाटा जवळ सोडा असे सांगत लिफ्ट मागितली. त्यांनतर संशयित अल्पवयीन मुलांनी ऋषिकेशला शरदचंद्र पवार मार्केट ते मखमलाबाद लिंक रोड येथील हमालवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर सोडले. यानंतर ऋषिकेश याने लिफ्ट देणाऱ्या मुलांकडेच दारुसाठी पैसे मागितले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि दोघांनी ऋषिकेशच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून करून पळ काढला. 


पोलिसांनी कसा केला उलघडा?


"पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 जानेवारी रोजी सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्या व्यक्तीला कोणीतरी दगडाने ठेचून मारल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. त्यावेळी व्यक्तीची कोणतीही ओळख पटली नव्हती. त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते. अधिकाऱ्यांनी अतिशय कौशल्याने त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. ओळख पटल्यावर हा व्यक्ती ऋषिकेश दिनकर भालेराव नावाचा 19 वर्षीय तरुण होता. त्यानंतर ऋषिकेशची हत्या कोणी केले हे शोधणे महत्त्वाचे होते. तपास केल्यानंतर असे लक्षात आले की यामध्ये दोन अल्पवयीन मुलांनी त्याला दगडाने ठेचून मारले आहे," अशी माहिती नाशिक शहर, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.


"कोणताही पुरावा नसताना पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा उलघडा केला आहे. आरोपी हे विद्यार्थीच आहेत. तर मयत ऋषीकेशला आरोपींनी लिफ्ट दिली होती. त्यानंतर आरोपींकडे मयत ऋषिकेशने पैसे मागितले आणि त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन त्यांनी दगडाने ठेचून ऋषीकेशची हत्या केली. आरोपी हे विद्यार्थी असून ते पंचवटी परिसरात राहत होते," अशीही माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.