योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : मलई पेढा (Malai Pedha) म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. कोणालाही हवाहवासा असा मलई पेढा. अगदी देवदर्शनाला गेल्यावरही देवाला पेढ्याचा प्रसाद अर्पण केला जातो. मात्र हाच पेढा तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकतो. देवाचा प्रसाद म्हणून खात असलेला पेढा नीट पाहूनच खा. नाहीतर तुम्हाला हॉस्पिटलच गाठावं लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक धक्कादायक प्रकार उघड झालाय नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar). अन्न आणि औषध प्रशासनाच्या (Food and Drug Administration) छाप्यात हे धक्कादायक वास्तव समोर आलंय.  हे पेढे दुधापासून बनवलेले नाहीत.. दुधाच्या मलईपासूनही बनवलेले नाहीत.. तर आरोग्यासाठी घातक असलेल्या पदार्थांपासून हे बनवण्यात आलेत. हे खाल्ले की तुम्ही आजारी पडलाच म्हणून समजा.. दुधाची स्कीम पावडर आणि पाम तेलाचा वापर करुन हे पेढे बनवलेले आहेत. गुजरातमधून (Gujrat) विकल्या जाणाऱ्या रिच स्वीट डिलाईट अनलॉग (Rich Sweet Delight Unlogged) नावाच्या अन्न पदार्थापासून पेढे तयार केल्याचे समोर आलंय.. 


नाशिकच्या अन्न आणि औषध प्रशासनाने 3200 रुपयांचे पेढे नष्ट केलेत. तर सुमारे 14 हजार रुपये किमतीच्या डिलाईट स्वीट अनलॉग च्या 8 पिशव्या जप्त केल्या आहेत.


काय त्रास होतो?


घशात खवखव, खोकला, पोटात दुखणं


चक्कर येणं, मळमळ, उलटी, जुलाबाची तक्रार


काविळसारख्या आजाराची लागण


किडनी आणि लिव्हरवर वाईट परिणाम 


विषबाधा जास्त झाल्यास मृत्यूचा धोका


दुधाचे पेढे असल्याचं सांगत ते तुमच्या माथी मारले जातायत.. काही दुकानदारांकडे आवश्यक परवाना नसल्याचंही उघड झालंय. तेव्हा पेढे विकत घेताना नेहमीच काळजी घेतली पाहिजे. पेढे उघड्यावरील दुकानातून घेऊ नयेत, खात्रीशीर असलेल्या नामांकित दुकानातून घ्यावेत, पेढे घेताना एक्सपायरी डेट पाहावी, पेढे घेताना तारखेसह आपल्या नावाने बिल घ्यावे, पेढे दुधापासून बनवले की नाही याची खात्री करावी


कोणत्याही देवळाबाहेर विविध प्रकारचे पेढे सर्वांनाच आकर्षित करतात. लहान मुलं तर पेढ्यांचा हट्ट करतात. पालकही आधी देवासाठी मग आपल्या मुलांसाठी हे पेढे खरेदी करतात. मात्र हेच पेढे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. तुम्ही घेत असलेले पेढे किंवा मिठाईचे पदार्थ शुद्ध असतीलच असं नाही. कारण शुद्धतेच्या नावावर होतेय फसवणूक. भेसळयुक्त पदार्थ ग्राहकांना देत त्यांची हातोहात फसवणूक केली जातेय. तेव्हा सावध रहा. सतर्क रहा आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या...