योगेश खरे / नाशिक : यंदा कोरोना (coronavirus) आणि लॉकडाऊमुळे (Lockdown) आधीच शिक्षणाचा (Education) खेळखंडोबा झाला आहे. आत्ता अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या असल्या तरी मुंबई, पुणे नाशिकसह अनेक शहरात अजूनही शाळा बंद आहेत. पण ऑनलाईन शिक्षण (Online Education) सुरु आहे. त्यात आता खासगी शाळांनी फी वसुलीसाठी पालकांचा छळ सुरू केला आहे. नाशिकमध्ये (Nashik) फी वसुलीसाठी (School fees) शाळेकडून धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. विस्डम इंटरनॅशनल स्कूलने (Wisdom International School) पालकांचे बँक स्टेटमेंट मागवले आणि आयटी रिटर्न, फी न भरलेल्या मुलांचं ऑनलाईन शिक्षण (Online Education) बंद केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या पद्धतीने झिजिया कर वसूल केला जायचा तसाच अतिरेकी प्रकार खासगी शाळा करत आहेत. नाशिकच्या विस्डम इंटरनॅशनल शाळेनं तर थेट फी न भरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे 6 महिन्यांचे बँक स्टेटमेट आणि आयटी रिटर्न्स मागवलेत. अॅडमिशन फॉर्मला बँक स्टेटमेंट जोडण्याचाही फतवा शाळेने काढला आहे. कोरोनामुळे उत्पन्न कमी झाले म्हणून फी वाढवू नका, असे आंदोलन झाल्यास पालकांची आर्थिक स्थिती काय होती हे जाणून घेण्यासाठी शाळेने हा प्रताप केला आहे. त्यामुळेच पालकांच्या पासबूकवर शाळांचा डोळा दिसून येत आहे.


फी दिली नाही म्हणून विविध प्रकारे नाशिक शहरात पालकांची मानसिक छळवणूक सुरू झाली आहे. नाशिकच्या विस्डम इंटरनॅशनल शाळेची मजल थेट इन्कम टॅक्स रिटर्न सादर करण्याचेपर्यंत गेल्याने नाशिकच्या पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिकच्या आनंदवल्ली परिसरातल्या विस्डम इंटरनॅशनल स्कूलचा हा अॅडमिशनचा फॉर्म पाहिल्यावर धक्का बसेल. या फॉर्मवर पालकांकडून चक्क इन्कम टॅक्स रिटर्न आणि बँक स्टेटमेंटची कॉपी मागितलीय. कोरोनामुळं उत्पन्न कमी झालंय म्हणून फी वाढवू नका असं आंदोलन झाल्यास पालकांची आर्थिक स्थिती काय होती हे जाणून घेण्यासाठी शाळेने हा प्रताप केला आहे. पालकांनी शाळेच्या या मुजोरीबाबत नाराजी व्यक्त केलीय. विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनची काळजी असल्यानं अनेक पालक पुढं येऊन बोलायला तयार नाहीत.


या संदर्भात 'झी २४ तास'ने विस्डम हायस्कूलच्या प्राचार्य आणि मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण ते बाहेरगावी असल्याचं सांगण्यात आले. बँक स्टेटमेंट आणि इन्कम टॅक्स रिटर्न मागणे बेकायदा असल्याचं शिक्षण उपसंचालकांनी म्हटले आहे. याबाबत तसे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी सांगितले आहे.



मनमानी फी वाढवली तरी पालकांनी फी भरावी यासाठी शाळांचे हे दबावतंत्र आहे. याचाच भाग म्हणून बँक स्टेटमेंट आणि इन्कम टॅक्स रिटर्न मागण्यात आले आहे. पालकांच्या उत्पनाची कुंडली मागणाऱ्या शाळांच्याच कमाईची मोजदाद व्हावी, अशी मागणी आता पालक करु लागले आहेत.