कांदा महागल्याने नाशिकमधील मिसळही झाली बेचव
कांद्याशिवाय मिसळ ही फिकी...
योगेश खरे झी मीडिया, नाशिक : देशभरात खवय्यांच्या तोंडाला चव आणणाऱ्या कांद्याचा पुरवठा नाशिक जिल्ह्यातून केला जातो. हीच नगरी मिसळ कॅपिटल म्हणून ओळखली जाते. कांद्यामुळे संपूर्ण देश अडचणीत आला असताना नाशिक शहरातील मिसळही बेचव झाली आहे.
उसळ, त्यावर तरतरीत रस्सा आणि त्याच्यासोबत शेव-पाव बघितलं की तोंडाला पाणी सुटलंच म्हणून समजा. आणि त्यातही हिरवी, पिवळी,तांबडी, मांसाहारी, चुलीवरची असे मिसळचे अनेक प्रकार आपल्याला नाशिकमध्ये खायला मिळतात. त्यासाठी खवय्ये खास महाराष्ट्रातून नाशिकला नक्की भेट देतात मात्र सध्या खवय्यांच्या जिभेवरची मिसळीची चव नाहीशी झाली आहे.
कारणही तसंच आहे कांद्याला बारा ते पंधरा हजार रुपये भाव मिळत असल्याने मिसळी मधून कांदा गायब झाला आहे. त्याचा तिखटपणा हरवल्यामुळे खवय्ये आणि मिसळ विक्रेते सुद्धा नाराज आहे.
मात्र धंदा करायचा म्हणजे विक्रेत्यांना शक्कल ही लढवायलाच लागणार. त्यामुळे कांद्याला पर्याय म्हणून काहीजण मिसळ सोबत काकड्या, कोबी देतात. नाहीतर चक्क ग्राहकांकडूनच कांद्यासाठी वेगळे पैसे घेतात. एकूणच कांद्यामुळे खवय्यांनाही आपल्या चवींना मुरड घालावी लागत आहे.