`ठाकरे` पाहून छगन भुजबळ म्हणतात...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे चित्रपट पाहिला
नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकेकाळचे खंदे समर्थक. नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांचे टोकाचे विरोधक आणि नंतर पुन्हा बाळासाहेब ठाकरेंशी झालेली जवळीक. हा प्रत्यक्ष जीवनानुभव असलेल्या छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातले मान्यवर तसंच राजकीय पदाधिकाऱ्यांसाठी ठाकरे चित्रपटाचा खास खेळ आयोजित केला होता. शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ अशी एकेकाळी ओळख असलेल्या छगन भुजबळ यांनी ठाकरे चित्रपट पाहिल्यानंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली.
'ठाकरे चित्रपटातून येणाऱ्या पिढीला शिवसेना काय आहे? आणि तिची उत्पत्ती कशी झाली, याची चांगली माहिती मिळू शकेल. या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांचे जीवन अगदी हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अगदी त्यांच्या भूतकाळात गेल्याचा भास त्यांच्या आवाजानं झाल्याचं सांगत छगन भुजबळ यांनी आपल्या शिवसेनेतल्या आठवणी ताज्या केल्या. ठाकरे चित्रपट हा ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असल्याने राणे भुजबळ नसले तरी काही फरक पडत नाही'. असंही छगन भुजबळ यांनी ठाकरे चित्रपट पाहून स्पष्ट केलं.
'ठाकरे चित्रपट बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. नवाजुद्दीननं केलेलं बाळासाहेबांचं काय अतिशय उत्तम आहे. तसंच प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण या पात्रांची निवडही अतिशय चांगली आहे. बाळासाहेब ठाकरे हे नाव देशाबाहेरही सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मी चित्रपटात जे काही पाहत होतो, ते फक्त बाळासाहेब ठाकरेंना पाहत होतो,' असं भुजबळ म्हणाले.