श्रावणात रानभाज्या खाताय, सावधान! बेतू शकतं जीवावर... नाशिकमधला धक्कादायक प्रकार
श्रावण आला की रानभाज्यांचा बहर येतो. रानावनातल्या पौष्टिक भाज्या म्हणून या भाज्या खाण्याला पसंती असते. मात्र याच रानभाज्या खाणं तुमच्या जिवावर बेतू शकतं. नाशिकमध्ये रानभाज्यांमधून अनेकांना विषबाधा झालीय.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : रानावनात फुलणारे दगड पालावरील हे आहेत भुईफोड. शहरात याला मशरुम म्हणतात. पौष्टिक बलवर्धक आणि सर्वाधिक प्रोटीन्स असल्यामुळे पावसाळ्यामध्ये आदिवासी (Tribal) बांधव मोठ्या प्रमाणात नैसर्गिक उत्पादित झालेले हे मशरूम्स (Mushrooms) जमा करतात. घरात तेलाची फोडणी देत कांदा टॉमेटो मिक्स करत त्याची भाजी करतात. मात्र हेच मशरूम खाऊन त्रंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव काचुरली परिसरातील नऊ जणांना विषबाधा (Poisoning) झालीये. या सर्वांना त्र्यंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यातील अनेकांना उलट्या मळमळ आणि अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने सलाईन लावण्यात आल्या. त्यातील दोन जण गंभीर झाल्यामुळे त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलीये. तब्बल तीन-चार दिवस उपचार घेतल्यानंतर सर्व पीडित घरी परतलेत.
व्यावसायिकरित्या पिकवलेले मशरूम आणि रानावनातले मशरूम यात फरक असतो हे समजून घेणं आवश्यक आहे. सध्या महामार्गावर वेगवेगळ्या रस्त्यांवर आदिवासी बांधव या भाज्या विकताना दिसतात. मात्र या भाज्या आपल्या प्रत्येकाच्या शहरी तब्येतीला मानवतील असं नाही असा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिलाय. रानावनातल्या भाज्या खाण्यापूर्वी त्यांची पूर्ण माहिती समजून घ्या.. आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.. अन्यथा हीच रानभाजी तुमच्या आरोग्यावर बेतू शकते.
रानभाज्या बनवण्याची पद्धत
पावसाळ्यात मुबलक प्रमाणात रानभाज्या आढळून येतात. रानभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पौष्टिक गुण असतात, त्यामुळे पावसाळ्यात त्या खाल्या जातात. पण रानभाजी कशी बनवायची हे माहित नसेल तर सल्ला घेऊनच भाजी बनवण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. रानभाज्या या नेहमी खाल्या जात नाहीत, त्यामुळे त्या नेमक्या कशा बनवताय, ती बनवण्याआधी कशी साफ करावी यांची पद्धतशीर माहिती असावी लागते. कारण रानभाज्यांमध्ये विषारी घटक असतात. त्यामुळे त्या भाज्या व्यवस्थित शिजवून, वाफवून किंवा त्यात नवा घटक टाकले जातात. असं केल्याने रानभाजीतले विषारी घटक कमी होतात आणि मग ती भाजी खाण्यायोग्य होते.
रानभाज्या चिरतानाही हाताला खाज येऊ शकते. त्यामुळे काही भाज्या चिंत घातल्याशिवाय करुन नका सल्लाही आहारतज्ज्ञ देतात. भाज्यांबरोबरच काही कंदही खाले जातात. पण हे कंदही कच्चे खाल्ले तर त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
का म्हणतात रानभाज्या?
शेती न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. जंगलात, शेतांच्या बांधावर, माळरानात या भाज्या लागवड न करता उगवतात. त्यामुळे या भाज्यांमध्ये खनिजे आणि अत्यंत उपयोगी रसायनीक असे घटक आढळतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात