सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : राज्यात सध्या दहावीची परीक्षा सुरु आहे. लाखो विद्यार्थी दहावीची परीक्षा (SSC Exam) देतायत. परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या बॅग मध्ये पुस्तक, पेन असणे आवश्यक असतं. मात्र नाशिकच्या एका शाळेत 10 वीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये चक्क कोयता (Koyta) मिळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) नोंद करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांच्या स्कुल बॅगेत कोयता
दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या परिक्षात पास होण्यासाठी विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करतात. चांगले गुण मिळवून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचं प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं. कोणाला डॉक्टर, तर कोणाला इंजिनिअर बनायचं असतं. कोणाचं चार्टर्ड अकाऊंटंट बनण्याचं स्वप्न असतं. आपलं आणि पालकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी झटत असतो. पण नाशिकमध्ये दहावितल्या एका विद्यार्थ्याच्या कारनाम्याने शाळा प्रशासन हादरून गेलंय.  नाशिकमधील औद्योगिक वसाहतीत असलेल्या हिंदी भाषिक शाळेत एका विद्यार्थ्याने परीक्षेलायताना चक्क कोयता आणला होता. 


असं झालं उघड
सातपुरच्या हिंदी भाषिक शाळेत 10 वीची परीक्षा होती. या परीक्षेत नेहमी प्रमाणे सर्व विद्यार्थी परिक्षा देण्यासाठी शाळेत आले. परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या बॅग परीक्षा हॉलच्या बाहेर ठेवल्या. या परीक्षा केंद्रावर सुरक्षा रक्षक म्हणून एका होमगार्डची नेमणूक होती. या होमगार्डला परीक्षा हॉल बाहेर ठवलेली बॅग संसायस्पद वाटली. बॅग चेक केली असता त्यात कोयता मिळून आला. याची माहिती सातपूर पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे पथक घटना स्थळी दाखल झाले. परीक्षा संपल्यानंतर संशयास्पद बॅग उचलणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिले. कोयता कुठून आला? मुलाला कोयता कोणी दिला ? आशा अनेक प्रश्नाच्या उत्तरांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माच्छरे यांनी दिली आहे. 


अल्पवयीन मुलांमध्ये वाढतेय गुन्हेगारी
गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यात तलवारीने केक कापणे असो, किंवा हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असो. हेच व्हीडिओ बघून अल्पवयीन मुलांच्या मनात आपणही असंच भाईगिरी करावी, आपलाही परिसरात दरारा असावा अशी भावना निर्माण होते. अल्पवयीन मुलं नकळत गुन्हेगारीकडे वळताना दिसत असल्याचं मानसोपचार तज्ञ डॉ. उमेश नागपूरकर सांगतात तसेच या मुलांकडे पालकांनी लक्ष ठेवण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे.