122 वर्षांनंतर पुन्हा वेदोक्त मंत्राचा वाद, संयोगिता राजेंना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखलं?
माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नी संयोगिताराजे यांच्या एका इन्स्टाग्राम पोस्टनं खळबळ माजलीय. संयोगिताराजेंना चक्क वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आलं.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : 122 वर्षांनंतर पुन्हा एकदा वेदोक्त प्रकरण चर्चेत आलंय. राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Chatrapati Shahu Maharaj) यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास रोखण्यात आलं होतं. त्याविरोधात शाहू महाराजांनी मोठा लढाही दिला. काळ बदलला, आपण 21 व्या शतकात आलो. मात्र परिस्थिती आणि मानसिकता अजूनही तशीच आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती (Sanyogitaraje Chatrapati) यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातच (Nashik Kalaram Temple) हा धक्कादायक प्रकार घडल्याचं स्वत: संयोगिताराजे यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय..
संयोगिता राजेंची पोस्ट
नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच. तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षेचं पठण केलं.
जितेंद्र आव्हाड यांची टीका
या प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. या राज्याच्या राणीचे जर हे हाल होणार असतील तर सामान्यांचं काय. बहुजनांनो जागे व्हा असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
महंतांनी मांडली बाजू
संयोगिताराजेंचा गैरसमज झाल्याचं म्हणत त्यांच्या आरोपांवर काळाराम मंदिराच्या महंतांनी आपली बाजू मांडलीय. अग्नीहोत्र केल्यानंतर वेदोक्त पुजा होत असते आणि तो छत्रपती घराण्याचा अधिकार आहे. पण हा प्रकार गैरसमजातून झाला, त्यांना भेटून हा गैरसमज दूर करुयात असं महंतांनी म्हटलंय.
इतिहासकरांनी सांगितली ती आठवण
या प्रकरणानंतर आता इतिहासकार राजर्षी शाहू महाराजांसोबत घडलेल्या प्रसंगाची आठवण करून देत आहेत. तुम्ही क्षत्रिय नाही तर क्षुद्र आहात, असं त्यांना सांगण्यात आलं, पण छत्रपती शाहू महाराजांनी ही जी लढाई आहे ती स्वत: पुरता मर्यादीत न ठेवता, ती व्यापक स्तरावर नेली, जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण केली.
शाहू महाराजांसोबत जे घडलं तेच संयोगिताराजेंसोबत घडल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे काळ बदलला पण मानसिकता कधी बदलणार असा सवाल उपस्थित केला जातोय..