योगेश खरे, नीलेश वाघ  / नाशिक :  कांदा व्यापाऱ्यांच्या अडमुठ्या धोरणामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याला मागणी वाढत आहे. मात्र लिलावच बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंदचा आजचा दुसरा दिवस आहे. केंद्राने कांदा साठवणुकीवर निर्बध आणल्याने  व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. व्यापाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणाचा आजचा दुसरा दिवस आहे. आजही अनेक बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्ह्याचे अर्थकारण असणाऱ्या कांद्याचे बाजार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. जिल्ह्यातील मोठ्या पंधरा बाजार समित्या आज पूर्णपणे बंद राहण्याची शक्यता आहे. सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बाजार समितीत आज एकही कांदा उत्पादक शेतकरी आलेला नाही. त्यामुळे कांदा खरेदी पूर्णपणे ठप्प राहणार याची चिन्हे आहेत.



एकूण जिल्ह्यातली परिस्थिती बघितली तर दररोज ६० ते ७० हजार टन कांद्याची आवक नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये होत असते. मात्र कालपासून ही आवक पूर्णपणे ठप्प झाली आहे .त्यामुळे जिल्ह्यात दररोज सरासरी पन्नास कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.


दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी आपल्याजवळ साठवून ठेवलेला कांदा बाजारपेठेत आणतो दिवाळीच्या दरम्यान त्याला चांगला भाव मिळतो, असा त्याचा अनुभव असल्याने तो बऱ्याच वेळा कांदा साठवून ठेवतो. मात्र बहुतांशी कांदा यावेळेस कोरोनाच्या संकटाने विकावा लागला. परिणामी आता दिवाळीतही ही मोठे आर्थिक संकट शेतकर्‍यांसमोर उभे राहिले आहे.


नाशिक जिल्ह्यातल्या गेल्या २४ तासात १२ बाजार समित्या बंद होत्या. आज पंधराच्या पंधरा पूर्ण बाजार समित्या बंद होण्याची शक्यता आहे. त्यासोबत नऊ उपबाजार समिती सुद्धा बंद राहिल्या तर छोटा शेतकरी सुद्धा नैसर्गिक आपत्ती सोबत आर्थिक आपत्तीमुळे मारला जाईल, अशी परिस्थिती आहे.