COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक : आपल्या शिस्तप्रिय कामासाठी ओळखले जाणारे नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या त्यांनी दिलेल्या व्याख्यानामूळे चर्चेत आले आहेत.  काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेचे सहाय्यक अभियंते रवींद्र पाटील कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठी लिहून आठवडाभर बेपत्ता होते. ज्या दिवशी पाटील गायब झाले, नेमके त्याच दिवशी तुकाराम मुंढे सुट्टीवर गेले. मुढेंवर या काळात अनेक आरोप झाले. आठ दिवसानंतर पाटील परत आले. मुंढेंही सुटीवरून परतले. काल व्याख्यानादरम्यान या सगळ्या घटनेमागची कहाणी मुंढेंनी जाहीर केली.


कामाचा दबाव ?


मुढेंनी दिलेल्या माहितीनंतर अभियंते रवींद्र पाटील गायब होण्यामागे खरंच कामाचा दबाव होता का? याविषयी प्रश्नचिन्हं उपस्थित होतंय. नाशिकमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने आयुक्त तुकाराम मुंढे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुंढे बोलत होते. 


तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण


रवींद्र पाटील गायब झाल्याचं समजल्यानंतर माझं पहिलं वाक्य होतं... 'ते परत येतील...' त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरून मला याची खात्री होती, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलंय. कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलंय.  


मी यायच्या आधी ज्युनिअर इंजिनिअरकडे अनेक अधिकार होते... २२ मार्च रोजी एक परिपत्रक काढून ज्युनिअर इंजिनिअरकडचे ओसी, बांधकाम परवानगी अशा प्रकारचे काही अधिकार काढून घेतले होते. त्यामुळे उलट पाटलांचं काम कमी झालं होतं, असंही मुंढे यांनी स्पष्ट केलंय. 


काय आहे हा प्रकार


नगररचना विभाग हा आपल्या ढिसाळ कारभारासाठी प्रसिद्ध आहे. अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या कमी करण्यात आल्यानंतरही अधिकाऱ्यांवरचा दबाव वाढत असेल तर त्यासाठी त्यांची भ्रष्ट मानसिकता कारणीभूत आहे, असंही मुंढे यांनी म्हटलंय.