सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये साडेनऊ वर्षांपूर्वी एक कोटीच्या खंडणीसाठी (ransom) मुलाचे अपहरण (kidnapping) करून त्याची हत्या केल्याची घटनेप्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. जवळपास साडेनऊ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रकरणी गुन्ह्यातील दोघांना दोषी ठरवून न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मंगळवारी झालेल्या युक्तिवादात तिघा संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांत गुन्हा दाखल होताच केली हत्या


8 जून 2013 रोजी मयत विपीन गुलाबचंद बाफणा (२२ रा. वसंतविहार ओझर,ता. निफाड जिल्हा नाशिक) हा डान्स क्लासला जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर काही अज्ञानातांनी विपिनचे अपहरण करुन खंडणी मागितली. आरोपींनी विपिनच्या मोबाईलवरून गुलाबचंद बाफना यांना फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी संशयितांनी विपीन बाफना याची निर्घृण हत्या केली.


नऊ वर्षानंतर फाशीची शिक्षा


यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून या हत्याकांडातील संशयित अमन जट (रा. रिव्हर व्युह अपार्टमेंट, केवडीबन, पंचवटी) चेतन यशवंतराव पगारे (25 रा. ओझर टाऊनशिप,) अक्षय उर्फ बाल्या सुरज सुळे (21 रा. जनार्दन नगर, नांदूर नाका) संजय रणधीर पवार (27 रा. महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा) पम्मी भगवान चौधरी, (32 रा. भारत नगर, वडाळा रोड नाशिक) यांना अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल केला होता. अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या या प्रकरणाचा खटला न्यायालयात तब्बल साडेनऊ वर्ष चालला. यासाठी पोलीस अधिकारी,साक्षीदार आणि पंचांचे जबाब नोंदवण्यात आले होते. त्यानंतर आताा नाशिक न्यायालयाने संशयित असलेल्या चेतन यशवंत पगारे आणि अमन प्रकट सिंग जट यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे.