योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक जसं मंदिरांसाठी ओळखलं जातं तसच ते तर्रीदार, झणझणीत मिसळीसाठीही ओळखलं जातं. नाशिकच्या मिसळ परंपरेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. काळ जसा बदलत गेला तसा मिसळीचा स्वाद आणि पद्धतीही बदलल्या. यातूनच पुढे आली निखाऱ्यांची मिसळ.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निखाऱ्याची ठसकेबाज मिसळ
निखाऱ्याची धग आणि धूर यांच्या मिश्रणानं तयार झालेली ठसकेबाज मिसळ खव्वयांच्या पसंतीस उतरली. सात वर्षांपूर्वी ओवारा निखारा मिसळ नावानं ती लोकप्रिय झाली. संशोधनाअंती आस्वाद मिळाल्यानं निखारा मिसळीचा ट्रेडमार्कही घेण्यात आला. मात्र याच पद्धतीनं दुसऱ्या एका दुकानदारानं गावरान निखारा मिसळ सुरू केली आणि नाशकात निखाऱ्यांचा वाद पेटला.


या निखाऱ्याची धग थेट कोर्टापर्यंत पोहचली. गावरान मिसळवाल्यानं निखारा शब्द काढून टाकावा म्हणून तीन वर्षांपासून हा लढा सुरू होता. अखेर कोर्टानं निखारा शब्द वापरण्याचे हक्क मूळ मालकाला दिले आहेत.



मातीच्या मडक्यात एका छोट्या वाटीत निखारा ठेवून तयार करण्यात आलेल्या मिसळीची चर्चा सध्या नाशिकमध्ये रंगलीय. मात्र स्वादाचा वाद पेटल्यानं खवय्ये नाराज आहेत.


तुम्हीही अशी हटके पाककृती तयार केली असेल तर ट्रेडमार्क घेऊन ठेवा. नाहीतर निखारा मिसळीप्रमाणे स्वादासाठी तुम्हाला वादाचा सामना करावा लागू शकतो.