विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : जायकवाडी धरणाचे दरवाजे तब्बल तीन वर्षानंतर उघडलेत. जायकवाडी धरणातून तीन वर्षानंतर पहिल्यांदाच गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय. जायकवाडीच्या नाथसागर जलाशयाच्या या पाण्यानं दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील जनतेला थोडा दिलासा मिळालाय. मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ आहे. जायकवाडीत पाणीच नव्हतं तर ते गोदावरीत सोडणार कुठून? अजूनही मराठवाड्यावर पाऊस रुसलेलाच आहे. पण नाशिक जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे जायकवाडी धरणाचा नाथसागर जलाशय भरलाय. गेल्या तीन वर्षात हे पहिल्यांदा झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदूर मधमेश्वर आणि गंगापूर धरणातून सध्या गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडीत होणाऱ्या पाण्याची आवक पाहता आणखी काही दरवाजे उघडण्यात येणार आहेत. धरणातून सोडलेल्या पाण्याचा नांदेडपर्यंतच्या दुष्काळग्रस्त जनतेला लाभ होणार आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असल्यानं तहसीलदारांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय.



पाऊस नसतानाही जायकवाडी आणि गोदामाईच्या कृपेनं दुष्काळग्रस्तांच्या घोटभर पिण्याच्या पाण्याची सोय झालीय. आता पाऊस बरसला तर मराठवाड्यातल्या जनतेच्या भाळी लिहलेला दुष्काळ कायमचा मिटेल यात शंका नाही.