व्हिडीओ जर्नलिस्ट अनिल सौंदड़े सह दिनेश दुखंडे झी मीडिया, नाशिक: समृद्धी महामार्गामुळे काही गावं कोटींच्या घरात पोचलीयेत...प्रकल्पाला  असलेला विरोध ताणून धरण्यापेक्षा इथल्या शेतक-यांनी वेळीच आपला फायदा कशात आहे हे हेरलं.... पाहुया समृद्धीचं एक लाभार्थी गाव.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समृध्दी महामार्गाला काही गावांनी कडाडून विरोध केला असला तरी एका गावांचं नशीब अक्षरश: फळफळलंय. या प्रकल्पामुळे हे गाव रातोरात श्रीमंत झालंय...कोट्यवधी झालेलं असंच एक गाव म्हणजे पांडुर्ली...


नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमधलं हे पांडुर्ली गाव...गाव तसं साधं पण, सध्या इथं लोकांच्या तोंडी सध्या कोटींशिवाय बात नाही......हायवेहून गावात प्रवेश करताना वेशीवर असलेल्या पाण्याच्या टाक्या बघितल्यानंतर शोले पिच्चरमधला धर्मेंद्रचा तो फेमस सुसाईडवाला सीन आठवल्याशिवाय राहत नाही...वेशीवर असलेल्या मंदिराचंही सध्या रंगकाम सुरु आहे...इथं जो तो आपल्या कामात गुंतलेला...पण गावात आलेला टीव्ही चॅनेलचा कॅमेरा पाहिल्यानंतर लोकं थोडी ओशाळतात...त्याचं त्यांना  अप्रूपही वाटतं...एरव्ही या गावाकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नसतं...पण आता इथून समृद्धी महामार्ग जात असल्यानं सध्या गाव चर्चेत आलंय...


समृद्धी महामार्गाला आपल्या जमिनी, झाडं आणि घरं दिल्याच्या मोबदल्यात गावातल्या शेतकऱ्यांना थोडेथोडके नाही तर तब्बल 41 कोटी रुपये मिळालेत...पांडुर्लीला अगदी खेटून असलेल्या शिवडे गावात मात्र अजूनही शेतकऱयांचा समृद्धीविरोधी लढा सुरु आहे...पण पांडुर्ली आता समृद्धीच्या मोबदल्याचा उच्चांक गाठणारं तालुक्यातलं क्रमांक एकचं गाव बनलंय... गावातल्या समृद्धीबाधित काही कोट्यधीश शेतकऱयांना आम्ही भेटायचं ठरवलं आणि थेट त्यांच्या घरी धडकलो...


गावात रहदारीसाठी आज एकच डांबरी रस्ता आढळतो...शेतपाड्यावर राहणा-यांना गावात येण्या -जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत...पावसात नदीला पूर आला की सगळे हालच हाल...मग अशावेळी शेतकऱयांची शाळेत जाणारी मुलं, घरातल्या गर्भवती स्त्रिया, आजारी व्यक्तींनी फक्त त्रासच भोगायचा...पण आता समृद्धी महामार्गामुळे पैसे तर मिळालेच पण हा त्रासही मिटेली याची त्यांना खात्री वाटतेय...कारण मिळालेल्या पैशातून शेतकरी दुसऱ्या गावात शेतजमीन आणि घर घेणार आहेत. महामार्गामुळे होणाऱ्या विकासात गावाचं भलं झालेलं कुणाला नकोय?